CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'या' ११ शहरांमध्ये दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:50 AM2021-06-02T06:50:06+5:302021-06-02T06:50:44+5:30
दिलासादायक चित्र; राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला
मुंबई : राज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली असून, मंगळवारी तब्बल ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर दुसरीकडे दिवसभरातील मृत्यूंची ४७७ ही संख्या थोडी चिंता वाढविणारी असली, तरी औरंगाबाद ग्रामीण, ठाणे, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, भंडारा, गडचिराेली अशा ११ शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
राज्यात मंगळवारी १४ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या २,३०,६८१ इतकी झाली आहे. नव्या बाधितांची संख्या वीस हजारांखाली आल्याने मागीलवर्षीच्या उच्चांकी रुग्णसंख्येवरून बाधितांचा आलेख उतरणीला लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्क्यांवर गेल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका झाल्याचे पाहायला मिळते. रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होऊ लागल्याने मंगळवारपासून अनेक शहरांत दुकाने उघडण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे बाजारपेठ महिनाभरानंतर पुन्हा गजबजू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मंगळवारी एकही बाधित रुग्ण आढळला नाही, तर भिवंडी, परभणी शहरात प्रत्येकी ७, तर जळगाव शहरात केवळ आठ नवे रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराखाली
मुंबईतही रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचे दिसते आहे. गेले काही दिवस येथील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्याखाली नोंदवली जात आहे. मंगळवारी मुंबईत ८३१ नवे रुग्ण आढळून आले.
या शहरांत शून्य मृत्यू
ठाणे, उल्हासनगर भिवंडी, मीरा-भाईंदर, औरंगाबाद ग्रामीण, धुळे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, गोंदिया या शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर कल्याण-डोंबिवली, पनवेल, जळगाव आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.