CoronaVirus News: कोरोना बळींच्या वारसांना पाच लाख; ताफ्यात नवीन बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 09:10 AM2021-06-02T09:10:16+5:302021-06-02T09:10:48+5:30
एसटीच्या वर्धापनदिनी योजना जाहीर
यवतमाळ/मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी कर्मचारी आणि प्रवाशांसाठी विविध योजना व उपक्रम जाहीर करण्यात आले. यात कोरोना बळींच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये देण्याच्या सरकारी योजनेला मुदतवाढ, लालपरीच्या ताफ्यात नवीन बसेस आदी घोषणांचा समावेश आहे.
एसटीने मंगळवारी ७४व्या वर्षात पदार्पण केले. कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन ठिकठिकाणी साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विविध घोषणा केल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.
कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहेे; परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत देण्याचे ॲड. परब यांनी जाहीर केले.
महाकार्गोच्या चालकाला १५० रुपये भत्ता
एसटीची ‘महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास सरसकट १५० रुपये प्रतिदिन भत्ता देण्यात येणार आहे.
ताफ्यात लवकरच येणार नवीन बसेस
प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य शासनाने नवीन बसगाड्या घेण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. जवळपास अडीच हजार गाड्या खरेदी करण्यात येतील. यामध्ये पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बस, एलएनजी, सीएनजी, साध्या तसेच आरामदायी गाड्यांचा समावेश असेल.
सोशल मीडियावर मिळणार माहिती
राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध केलेल्या योजना, सेवा तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटीने स्वतःचे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलिग्राम या समाजमाध्यमांवर अधिकृत खाते उघडले आहे.