CoronaVirus News : आरोग्य मंत्र्यांनी जाणून घेतली केरळची यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:40 AM2020-05-19T01:40:13+5:302020-05-19T01:40:45+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : केरळ मधील लोकसंख्येची घनता तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यात बऱ्यापैकी अंतर आहे.
मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी केरळ राज्याने कशाप्रकारे उपाययोजना राबविल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
केरळ मधील लोकसंख्येची घनता तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यात बऱ्यापैकी अंतर आहे. मात्र केरळच्या आरोग्य विभागाकडून जे काही अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहे त्याचा महाराष्ट्रात वापर करण्याविषयी विचारविनिमय केला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
सुमारे तासभर झालेल्या या संवादात केरळ राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. केरळमध्ये दिवसाला १२०० च्या आसपास चाचण्या होत असून तेथे १२ ते १३ प्रयोगशाळा असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घेत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना राज्यात आतापर्यंत ६१ प्रयोगशाळांच्या माध्यमातून पावणे तीन लाख चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
केरळचे विलगीकरणाचे धोरण, दर दिवसाला होणाºया चाचण्या, झोपडपट्ट्यांमधील संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, खासगी डॉक्टरांचे सहकार्य, साधनसामुग्रीचा तुटवडा, कंटेनमेंट झोनमधील प्रतिबंध, प्लाझ्मा थेरेपीचा वापर याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. केरळमधील रुग्ण संख्याही कमी असून तेथे खाटांची कमतरता नाही. मानोसोपचार तज्ञांचे गट करून त्यांच्यामार्फत अलगीकरण केलेल्या लोकांची तसेच आरोग्य कर्मचारी यांचे समुपदेशन केले जाते. त्याचबरोबर तेथील प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू, ख्यातनाम व्यक्ती यांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडाचे विकार आहेत अशा लोकांना (कोमॉर्बीड) घराबाहेर पडू दिले जात नाही.