CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन वाढणार?; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:24 PM2020-05-08T12:24:52+5:302020-05-08T12:25:33+5:30
कोरोना संकटाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या नेत्यांनी केलेल्या सूचना ऐकल्या. आता मे अखेरपर्यंत काळजी घेऊन आपल्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. आपण सगळे एकजुटीनं हे संकट दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी काल मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीत सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती यावेळी सरकारकडून देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही, त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझव्र्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणं व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगलं नियोजन केलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. केंद्राकडे अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत. पोलिसांचं नैतिक बळ वाढवायला हवं. आपली अर्थव्यवस्था सुरू करताना क्षेत्रनिहाय तज्ज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील. तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज ठाकरेंनी केली. परप्रांतीयांमुळे इथल्या सोयी सुविधांवर ताण येतो. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो, हे आपण पाहिलं आहे. आता कोरोना संकटाच्या निमित्तानं परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्याची हीच ती वेळ, असं राज ठाकरे म्हणाले. परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येताना त्यांची नोंद व्हायला हवी, असं राज यांनी म्हटलं.
पालघर रेड झोनमध्ये येतं. पण याठिकाणी आदिवासी भागही आहे. त्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सकाळ, संध्याकाळ अशा रीतीने उपनगरी रेल्वेसेवा काही प्रमाणात तरी सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. तर रिक्षा, हातगाड्या घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठित करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.