CoronaVirus News : राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 09:04 PM2020-12-10T21:04:55+5:302020-12-10T21:12:24+5:30
CoronaVirus News : आज राज्यात दिवसभरात ३ हजार ८२४ नवे कोरोनाबाधित आढळले.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात ५ हजार ८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.५२ टक्क्यांवर पोहचले आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही आता १७ लाख ४७ हजारांच्याजवळ गेली आहे.
आज राज्यात दिवसभरात ३ हजार ८२४ नवे कोरोनाबाधित आढळले. तर दिवसभरात ७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहचली आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ९१० इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.
Maharashtra reported 3,824 new #COVID19 cases, 5,008 discharges & 70 deaths today.
— ANI (@ANI) December 10, 2020
Total cases: 18,68,172
Total recoveries: 17,47,199
Death toll: 47,972
Active cases: 71,910
Recovery rate: 93.52% pic.twitter.com/q0txeRxABx
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख २ हजार ४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६८ हजार १७२ (१६.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४१ हजार ५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी नव्या वर्षातच सुरु होणार
मुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. मुंबई शहर आणि उपनगरात आता कोरोना परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र सुरक्षेच्या कारणात्सव मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी नव्या वर्षातच सुरु होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. त्यामुळे लोकल सुरक्षेच्या कारणात्सव आता सुरु करणे योग्य नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितल्याने चाकरमान्यांना आणखी पुढील काही दिवस पर्यायी वाहतुकीने प्रवास करावा लागणार आहे.
मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी
कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर इकबाल चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे.
कोरोना लसीचे वितरण करण्यासाठी समिती
राज्यात कोरोनाचा फैलाव टळावा यासाठी येऊ घातलेली लस तातडीने वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या वितरणात सुसूत्रता यावी यासाठी सरकारने राज्यात मुख्य सचिवांच्या स्तरावर एक समिती गठीत केली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ही लस राज्यात विविध ठिकाणी रवाना करणे, यासाठीची वाहतूक, शितगृह आणि लस देण्यासाठी प्रशिक्षण याचा समावेश आहे, असे टोपे म्हणाले.