CoronaVirus News: चिंताजनक! डेल्टा प्लसचे ७ रुग्ण सापडले; राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:26 PM2021-06-20T12:26:21+5:302021-06-20T12:29:11+5:30
CoronaVirus News: अधिक संक्रामक असलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आल्यानं खळबळ
मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून यायचे. आता हाच आकडा ६० हजारांच्या खाली आला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. राज्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून आले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघरमध्ये डेल्टा प्लसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता याच व्हेरिएंटचं म्युटेशन झालं आहे. त्यामुळे जोखीम वाढली आहे.
कोरोना संसर्गाला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यासाठी डेल्टा प्लस कारणीभूत असेल असं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं तज्ज्ञाच्या हवाल्यानं दिलं आहे. या व्हेरिएंटमुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ ते १० लाखांपर्यंत जाऊ शकते आणि यातील १० टक्के रुग्ण लहान मुलं असू शकतात असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची नुकसान भरपाई देता येणार नाही - केंद्र सरकार
'नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. आम्ही काही नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल,' अशी माहिती डीएमईआरचे संचालक डॉ. लहाने यांनी दिली. डेल्टा प्लसचे ५ रुग्ण रत्नागिरीत आढळून आले आहेत. या ठिकाणी १० जूनपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट १३.७ टक्के इतका होता. याच कालावधीत राज्यातील सरासरी पॉझिटिव्हिटी रेट ५.७ टक्के होता.
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्गात संसर्ग वाढला आहे. त्यामुळे धोका कायम आहे.