CoronaVirus News : राज्यात आठवडाभरात काेराेनाचे २ हजारांहून अधिक बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:59 AM2021-04-11T00:59:03+5:302021-04-11T07:20:10+5:30
CoronaVirus News: राज्यात २ ऑक्टाेबर रोजी काेराेनाच्या तीव्र संक्रमणकाळात २४ तासांत ४२४, अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ८ एप्रिलला दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबई : राज्यात दिवसागणिक काेराेना संसर्गाचा विळखा घट्ट होत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवडाभरात काेराेनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. या कालावधीत राज्यात २ हजार १०० कोरोनाबळींची नोंद झाली.
राज्यात २ ऑक्टाेबर रोजी काेराेनाच्या तीव्र संक्रमणकाळात २४ तासांत ४२४, अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ८ एप्रिलला दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ११,९७५ बाधितांना जीव गमवावा लागला.
राज्याच्या मासिक मृत्यूदराचे प्रमाण फेब्रुवारीत ०.८ टक्का होते. मार्च महिन्यात ते ०.४ टक्क्यावर आले. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवडाभरात ०.५ टक्क्यावर पोहोचले. दिवसाला २ लाख कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित म्हणाले, कोरोना मृत्यूंचे प्रमाण राज्यात हळूहळू वाढते आहे. यामागे उशिराने होणारे निदान, खाटांचा अभाव, सहवासितांचा शोध घेण्यास कमतरता, ही कारणे असू शकतात. मात्र, आता टास्क फोर्सच्या मदतीने वेळोवेळी सल्लामसलत सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य हाेईल.
मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट
पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत दैनंदिन रुग्णांत १५ टक्क्यांची घट झाली. १० हजार रुग्णांची नोंद काही दिवसांपूर्वी सलग होत होती, ती आता ८,९३८ वर आली आहे. केंद्राकडून मुंबईत आलेल्या विशेष पथकाने येथील विलगीकरण व्यवस्था, लसीकरणाचे व्यवस्थापन उत्तम असल्याचे सांगितले. मुंबईत दिवसभरात ४९ हजार चाचण्या करण्यात आल्या.