CoronaVirus News : मुंबईकरांनो, सध्या गावी येऊ नका, आहे तेथेच थांबा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:36 AM2020-05-17T01:36:33+5:302020-05-17T06:46:07+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates :‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही.
जळगाव : मुंबई आणि पुण्यातून येत असलेल्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. दररोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या गाववाल्यांची वैद्यकीय तपासणी आणि अलगीकरण कक्षात त्यांची सोय करण्याचा ताण प्रशासनावरही वाढला आहे. शिवाय नव्या बाधितांमुळे समूह संसर्गाची भीती असल्याने ‘‘गाववाल्यांनो, सध्या तुम्ही गावाकडे येऊ नका’’, असे कळकळीचे आवाहन कोल्हापूर आणि कोकणवासीय करू लागले आहेत.
‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही. रुग्ण कमी होतील, कोल्हापूर कोरोनामुक्त होईल आणि ठप्प झालेले व्यवहार पूर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा सामान्य माणसाला होती. मात्र, लॉकडाउन तीनमध्ये राज्य सरकारने प्रवासाची परवानगी देताच मुंबई, पुण्यासह राज्यभरातील गाववाले आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. कोकण व कोल्हापूरमध्ये गावी येणाºयांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईकर आणि पुणेकरांची आहे.
रत्नागिरीत १ लाख मुंबईकर
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाख, १० हजार मुंबईकर दाखल झाले आहेत. १० दिवसांमध्ये ८० रुग्ण वाढले असून, त्यापैकी ७५ मुंबईकर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू असताना येणाºया चाकरमान्यांमुळे पुन्हा बाधितांचा आकडा ८ वर गेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यात ५ हजार गाड्या
बाधित व्यक्ती गावात येऊ लागल्याने गावेच्या गावे लॉक करावी लागत आहेत. एक मेपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार गाड्या मुंबई-पुणे येथून आल्या आहेत. वैद्यकीय पास घेऊन किमान २० हजार जण आले आहेत.जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ३७ पैकी २२ कोरोनाबाधित मुंबईतून आलेले आहेत.
जिल्ह्यात प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पुणे, मुंबईहून येणाºया नागरिकांना जिल्हाधिकाºयांची परवानगी असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बाहेरून येणाºयांनी प्रशासनाला समजून घ्यावे व सहकार्य करावे.
- सतेज पाटील,
पालकमंत्री, कोल्हापूर
मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना चाकरमान्यांना आता गावी आणणे योग्य नाही. रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईकरच अधिक आहेत. त्यामुळे मुंबईकरांना गावी आणणे थांबविणे गरजेचे आहे.
- अॅड़ दीपक पटवर्धन,
भाजप जिल्हाध्यक्ष, दक्षिण रत्नागिरी.