CoronaVirus News: दिलासादायक! ऑक्सिजनवर फक्त १८ टक्के रुग्ण; ८२ टक्के खाटा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:58 AM2022-01-18T06:58:16+5:302022-01-18T06:59:30+5:30

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या महानगर क्षेत्रातील २६,९६१ ऑक्सिजन खाटांपैकी सुमारे १८ टक्के म्हणजेच ४,७०७ ऑक्सिजन खाटांवर रुग्ण आहेत.

CoronaVirus News Only 18 percent of patients on oxygen | CoronaVirus News: दिलासादायक! ऑक्सिजनवर फक्त १८ टक्के रुग्ण; ८२ टक्के खाटा रिक्त

CoronaVirus News: दिलासादायक! ऑक्सिजनवर फक्त १८ टक्के रुग्ण; ८२ टक्के खाटा रिक्त

Next

मुंबई/ठाणे : कोरोना संसर्गाच्या आकड्यांमध्ये चढ-उतार होत असले तरी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या महानगर क्षेत्रातील २६,९६१ ऑक्सिजन खाटांपैकी सुमारे १८ टक्के म्हणजेच ४,७०७ ऑक्सिजन खाटांवर रुग्ण आहेत. ८२ टक्के खाटा रिक्त असून, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे. 

ओमायक्रॉन लाटेत बाधित रुग्णांना छातीच्या वरील भागातच संसर्ग होत असल्याने ऑक्सिजनची जास्त गरज भासत नसल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन सगळ्या स्थानिक प्रशासनांना ऑक्सिजन सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई या मोठ्या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांपर्यंत सगळ्यांनीच ऑक्सिजन साठ्याच्या क्षमतेत वाढ केली आहे. एकट्या मुंबईत ९०० मेट्रिक टनापर्यंत क्षमता वाढवण्यात आली आहे. 

दुसऱ्या लाटेसारखी स्थिती नाही, तरीही...
शहरातील ऑक्सिजनची उपलब्धता पुरेशी असून, दुसऱ्या लाटेसारखी स्थिती उद्भवलेली नाही. तरीही याकडे यंत्रणांचे लक्ष आहे. शिवाय, खासगी क्षेत्रातील ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्याकडे पालिका लक्ष ठेवून आहे. मागील आठवड्यात वाढलेली रुग्णसंख्या आता कमी होत असली तरीही पालिकेने केवळ थांबा आणि वाट पाहा, ही भूमिका घेतलेली नाही. संसर्गाच्या सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, सहवासितांच्या शोधावरही भर देण्यात येत आहे. 
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
 

ऑक्सिजन साठा तयार
जिल्ह्यात १२२०.९५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. सध्या आवश्यकतेनुसार ५६५.१९ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जात आहे. उर्वरित ६५५.७६ मेट्रिक टन  तयार करण्यासाठी यंत्रणा सक्षम आहेत. सिलिंडरच्या १२७.७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. त्यातील १००.८९ मेट्रिक टन सिलिंडरचा वापर सुरू आहे. जिल्ह्यात २२८.७५ मेट्रिक टन सिलिंडरच्या ऑक्सिजन निर्मितीची क्षमता तयार केली आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

 ऑक्सिजन खाटांची स्थिती
शहर             ऑक्सिजन     ऑक्सिजनवरील
    खाटा     रुग्ण      
मुंबई                   १२२८२        ३५३०
ठाणे                    २५२२               १५७ 
नवी मुंबई               ३४०४               ६७५
कल्याण-डोंबिबली     १६६०        ८५ 
उल्हासनगर             ३५५                 ०२ 
भिवंडी                    ११४                 ०२ 
भाईंदर                   १३९९                १७६
अंबरनाथ                 ५५                   १२ 
बदलापूर                 १२०              २३ 
वसई-विरार          २८१८                ०० 
रायगड               २२३२            ४५
एकूण            २६९६१          ४७०७

मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, पालिका आणि खासगी क्षेत्रात एकूण १२ हजार २८२ ऑक्सिजन खाटा उपलब्ध आहेत. त्यातील ३ हजार ५३० खाटांवर रुग्ण उपचाराधीन आहेत. ठाणे शहरात २,५२२ ऑक्सिजन खाटा उपलब्ध असून, त्यापैकी १५७ खाटांवर रुग्ण आहेत. सरासरी दोन टन ऑक्सिजन वापरला जातो आहे, तर एकूण क्षमता १७ टनाची आहे.

Web Title: CoronaVirus News Only 18 percent of patients on oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.