CoronaVirus News: गोपुरीच्या सेंद्रीय मास्कला इंग्लंडमध्ये मागणी; एक हजार मास्कची ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 03:45 AM2020-08-09T03:45:22+5:302020-08-09T03:45:59+5:30
मास्क निर्मितीमुळे मिळत आहे स्थानिकांच्या हाताला काम
वर्धा : कोरोनामुळे मास्कला मागणी वाढल्याने विविध संस्था, कंपन्या मास्क निर्मितीत उतरल्या आहेत. आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत देशी (सेंद्रिय) कापसापासून मास्क तयार केले असून हे मास्क सातासमुद्रापार पोहोचले आहेत.
ग्राम सेवा मंडळाने अस्सल सेंद्रिय कापसाच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. खादीमध्ये कार्यरत इंग्लंडमधील मित्रांना सुरुवातीला मास्कचे नमुने पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या पसंतीला उतरले आणि हळूहळू मागणी वाढू लागली. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आणि ग्रामसेवा मंडळाशी जुळलेले किशोर शहा व त्यांच्या मित्र परिवाराने या मास्कमध्ये विशेष रुची दाखविली. मास्कच्या आता चांगल्या आॅर्डर तेथे मिळत आहे. स्वातंत्र्यलढ्यात खादीने बंडाचा झेंडा रोवला. आता कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम, अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या खादीने मास्कच्या रूपात कोरोनाच्या लढ्यातही योगदान दिले आहे.
सुमारे महिनाभर काम केल्यावर इंग्लंड येथे मास्क पाठविण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची आॅर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. धुवून वापरता येतात.
- करुणा फुटाणे, अध्यक्ष,
क़जग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा