CoronaVirus News: दुकानं बंद राहणार; मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:22 AM2021-04-06T04:22:41+5:302021-04-06T07:13:27+5:30
सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यात मिनी लॉकडाऊन
मुंबई : महाराष्ट्रात आज पासून एकल दुकाने देखील बंद राहणार आहेत. त्याविषयी कोणताही संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी दिली आहे.
सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आम्ही काढलेले आदेश अत्यंत सुस्पष्ट आहेत. सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील असे त्या आदेशात म्हटलेले आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या नावाने दिशाभूल करणारे मेसेज फिरवले जात आहेत, मात्र एकल दुकाने मग ती कोणत्याही प्रकारची असली तरीही ती बंद राहणार आहेत.
राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील, असेही काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.
आता या सेवा देखील ‘आवश्यक सेवा’मध्ये
आवश्यक सेवेत आणखी काही सेवांचा समावेश राज्य सरकारने केला आहे. त्या अशा...
पेट्रोल पंप, संबंधित उत्पादने
सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, माहिती तंत्रज्ञान सबंधित पायाभूत सुविधा व सेवा
शासकीय व खासगी सुरक्षा सेवा
फळविक्रेते
आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे असे आदेश मंत्रालयातून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना देण्यात आले.