CoronaVirus News : "राज्य सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालतंय"; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मुद्दे ट्विट करत फडणवीसांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 09:45 PM2021-04-07T21:45:47+5:302021-04-07T21:46:52+5:30
CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे डॉ. हर्षवर्धन म्हटले आहे.
मुंबई : देशासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. यातच राज्यात ३ दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शिल्लक असून महाराष्ट्राला वेळेत लसीचा पुरवठा न झाल्यास तीन दिवसांत लसीकरण मोहीम बंद पडण्याची शक्यता आहे, अशी भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राजेश टोपे यांच्या या वक्तव्यानंतर कोरोना लसींबाबत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील एकंदरीत कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (CoronaVirus News: "The state government is endangering the lives of all people"; Fadnavis targets state government by Union Health Minister's statments )
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे डॉ. हर्षवर्धन म्हटले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लसींसंदर्भात केलेल्या विधानातील महाराष्ट्राशी संबंधित काही प्रमुख मुद्दे ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एक वक्तव्य आज जारी केले. त्यातील महाराष्ट्राशी संबंधित प्रमुख मुद्दे असे :
1. कोरोना प्रादुर्भाव होऊन एक वर्ष उलटले तरी अनेक राज्यांना कोरोना आटोक्यात आणण्याचे व्यवस्थापन जमलेले नाही.
2. आज अनेक राज्य 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसिकरणाची मागणी करीत आहे. परंतू मागणी-पुरवठ्याचा निकष, सर्व राज्य सरकारांशी दरवेळी पारदर्शीपणे चर्चा केल्यानंतर लसिकरणाचे धोरण निश्चित करण्यात आले.
3. लसिकरणाचा मुख्य उद्देश हा सर्वाधिक प्रभावित गटातील मृत्यूदर कमी करणे आणि यातून उर्वरित घटकांना कोरोना संक्रमणापासून दूर ठेवणे हा आहे. त्यामुळे आधी आरोग्य क्षेत्रातील आणि नंतर 45 वर्षांपेक्षा अधिकचे सर्व असे घटक यांची निवड करण्यात आली.
4. आता जो प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला, त्यात सरकारांनी काय केले?
महाराष्ट्राने आरोग्य कर्मचार्यांपैकी 86 टक्के लोकांना डोज दिले, तर दुसरीकडे 10 असे राज्य आहेत, ज्यांनी हे उद्दिष्ट 90 टक्क्यांहून अधिक गाठले.
5. महाराष्ट्राने आरोग्य कर्मचार्यांपैकी केवळ 41 टक्के लोकांना दुसरा डोज दिला, तर दुसरीकडे 12 राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी हे उद्दिष्ट 60 टक्क्यांहून अधिक गाठले आहे.
6. फ्रंटलाईन वर्कर्स या वर्गवारीत पहिला डोज देण्यात महाराष्ट्राने 73 टक्के लोकांचे लसिकरण केले, तर 5 राज्यांमध्ये हे प्रमाण 85 टक्क्यांहून अधिक आहे.
याच वर्गवारीत दुसरा डोज महाराष्ट्रात 41 टक्के लोकांना देण्यात आला, तर 6 राज्यांत हे प्रमाण 45 टक्क्यांहून अधिक आहे.
7. ज्येष्ठ नागरिक या वर्गवारीत महाराष्ट्रात 25 टक्के लसिकरण झाले आहे. सुमारे 4 राज्यांत हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे.
8. गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली. केंद्रीय चमू पाठविल्या. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले, याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत, तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रूग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत.
9. महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे.
10. आतापर्यंत मी गप्प राहिलो. पण, माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावे लागते आहे. राजकारण करणे हे नेहमीच सोपे असते. पण, सुशासन आणि आरोग्य सुविधांचे निर्माण ही खरी क्षमतेची परीक्षा असते.