CoronaVirus News : राज्यात कोरोनाची येणार तिसरी लाट?, ‘आयएमए’च्या राज्य अध्यक्षांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:45 AM2020-11-03T01:45:26+5:302020-11-03T06:41:31+5:30
CoronaVirus News in Maharashtra : ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ झाली. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. राज्याच्या मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये नव्या कोरोना रुग्णांचे निदान आणि बळींचा आकडा कमी होत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महाराष्ट्र प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी ट्विट करून राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे म्हटले आहे.
ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ झाली. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. ऑक्टोबरच्या शेवटी दररोजच्या रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत गेली. २६ ऑक्टोबरला एकाच दिवशी ३६४५ रुग्ण आढळले. २७ ऑक्टोबरला ५३६३, २८ ला ६७८३, तर २९ ऑक्टोबरला ५९०२ रुग्णांची नोंद झाली. ३० ऑक्टोबरला ६१९० रुग्ण आढळले. ३१ ऑक्टोबरला ही संख्या ५५४८ एवढी होती. शेवटच्या आठवड्यात वाढलेली ही संख्या चिंतेची असल्यामुळे ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रुग्णवाढ चिंता वाढवणारी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, सप्टेंबरच्या मध्यवर्ती काळात राज्यात आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या २३ हजारपर्यंत जाऊन आली. त्यामुळे त्या वेळी असलेली लाट ओसरली, मात्र पुन्हा दिसणारी रुग्णवाढ चिंता वाढविणारी आहे. अनेक गोष्टी पूर्ववत झाल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपासून दुसरी लाट पाहायला मिळेल असे चित्र आहे. परिणामी, चाचण्यांची क्षमता आणि सहवासितांचा शोध यावर यंत्रणांनी भर देणे गरजेचे आहे.