CoronaVirus News: राज्याच्या चिंतेत भर; डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे विषाणू सापडल्यानं धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:02 AM2021-08-16T08:02:40+5:302021-08-16T08:03:09+5:30
CoronaVirus News: राज्यात वाढतोय डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आतापर्यंत ६६ जणांना लागण
मुंबई: राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज ५ ते ६ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र तज्ज्ञांची चिंता कायम आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमणाचा धोका कायम आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट समूहाच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांच्या चिंतेत भर घातली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या नव्या रुपाचा धोका जाणून घेण्यासाठी अभ्यासाची गरज आहे.
राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे एकूण ६६ रुग्ण असल्याची माहिती विषाणूच्या जिनॉम सिक्वन्सिंगद्वारे समोर आली. यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन विविध प्रकार आहेत. त्यांना Ay.1, Ay.2 आणि Ay.3 अशी नावं देण्यात आली आहेत. तज्ज्ञांनी डेल्टा प्लसच्या आणखी १३ उपवंशांचा शोध लावला आहे. Ay.1, Ay.2, Ay.3 पासून त्यांची सुरुवात होते आणि हीच यादी १३ पर्यंत जाते. डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन झाल्यानं डेल्टा प्लसची निर्मिती झाली. डेल्टाच्या स्पाईक प्रोटिनमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाला.
मुंबईलादेखील डेल्टा प्लसचा धोका
मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व मुंबईत एका ६३ वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेच्या कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही जणांना डेल्टाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यात एका ६९ वर्षीय महिलेचा डेल्टामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय रत्नागिरीत ८० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत ६६ रुग्ण
महाराष्ट्रात आतापर्यंत डेल्टा प्लसचे ६६ रुग्ण आढळले आहेत. यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. डेल्टाची लागण झालेल्या ६६ पैकी काहींनी कोरोना प्रतिबंधात्मत लसीचे दोन्ही डोस घेतले होते. राज्याच्या विविध भागांत रुग्णांचे नमुने घेऊन जिनॉम सिक्वन्सिंग करण्यात आलं. त्यातून ही माहिती समोर आली. डेल्टा प्लसचे सर्वाधिक १३ रुग्ण उत्तर महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर रत्नागिरी (१२) आणि मुंबई (११) चा क्रमांक लागतो.