CoronaVirus News: आज कोरोनासारख्या विषाणूंचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:04 AM2020-06-27T01:04:11+5:302020-06-27T01:04:26+5:30
सूक्ष्म जीवन ना टाळता येत ना पाळता येत असे आपले त्यांच्याशी नाते आहे.
मुंबई : आज आंतरराष्ट्रीय सूक्ष्म जीवसृष्टी दिन आहे. यानिमित्त सृष्टिज्ञान संस्थेतर्फे सूक्ष्म जीवसृष्टी या विषयावर आॅनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. आपल्या सभोवतालच्या सर्वांत मोठ्या जीवसृष्टीची ओळख याद्वारे करून घेता येईल. सूक्ष्मजीव म्हणजे अर्थात जीवाणू, विषाणू आणि बुरशी असे निसर्गातील घटक ज्यांच्या सान्निध्यात आणि सोबतच मानवजात जगात असते. कधी ते आपल्याला उपकारक असतात तर कधी कोरोना सारख्या महामारीचे भयंकर रूप घेऊन आपल्यासमोर येतात. सूक्ष्म जीवन ना टाळता येत ना पाळता येत असे आपले त्यांच्याशी नाते आहे.
सूक्ष्म जीवांचे आपल्या जीवनातील स्थान आणि महत्त्व लोकांना लक्षात यावे म्हणून युरोपमधील आयर्लंड देशातील एलिमेंटरी फार्माबायोटिक सेंटर या जीवाणू संशोधन संस्थेने २७ जून हा दरवर्षी जागतिक सूक्ष्म जीवसृष्टी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. युरोपिअन युनियनच्या युरोपिअन फूड इन्फॉर्मशन कौन्सिलने यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने जगाला एका महामारीच्या भयंकर संकटात नेऊन ठेवले आहे. अशा वेळी सूक्ष जीवांबद्दल शास्त्रीय आणि संदर्भीय माहिती सृष्टिज्ञान संस्थेच्या प्रश्नमंजुषेमार्फत मिळू शकेल. आणि सूक्ष्म जीवसृष्टीकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित व्हायला मदत मिळेल. २७ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच प्रश्नमंजुषेची लिंक फेसबुक व्हॉट्सअप आणि अन्य मार्गाने सृष्टिज्ञान संस्थेच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. या प्रश्नमंजुषेमध्ये मुंबईतील आणि मुंबई बाहेरील शाळा महाविद्यालये भाग घेणार आहेत. सहभागींपैकी ४० टक्के बरोबर उत्तरे देणाऱ्यांना आणि ई-मेल अचूक लिहिणार्यांना प्रमाणपत्र पाठवले जाईल.