CoronaVirus News: मास्कपासून कधी होणार सुटका?; टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितली नेमकी वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:10 AM2021-10-22T08:10:05+5:302021-10-22T08:12:00+5:30
दुसरी लाट मंदावली; टास्क फोर्सच्या डॉक्टरांची माहिती
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसने राष्ट्रीय पातळीवर १०० कोटी लसींचा टप्पा पार केला. यात राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. कारण राज्याची व्यापकता लक्षात घेता लस उत्पादक आणि आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ या दोन घटकांमुळे लसीकरण मोहीम यशस्वी होऊ शकली आहे. कोरोनाशी केलेल्या संघर्षाला २० महिने उलटले असले तरीही मास्कपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला आणखी वर्ष लागेल, असे निरीक्षण राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती मात्र कायम आहे. सध्या जरी तिसऱ्या लाटेची शक्यता नसली तरी दिवाळीनंतर कोरोनाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाच व्यक्त होत आहे. राज्यात ७० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आणखी वेगाने लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी दिली.
सध्या कोणताही नवीन व्हेरियंट आढळला नसून फक्त डेल्टा व्हेरियंट राज्यात सर्वत्र आहे. तसेच दिवाळी नंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. कोरोनाच्या नियमांचे व्यवस्थित पालन केले तर तिसरी लाट थोपवता येईल. दरम्यान, राज्यात दररोज दीड लाख चाचण्या होत आहेत. चाचण्या करण्यात दोन लाख ही संख्या उच्चांकी आहे. चाचण्या कमी केलेल्या नाहीत. त्यामुळे मागील दोन-चार महिन्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याचे दिसत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना आणि लसीकरण हेच महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनाविरोधी लढ्यात लसीकरण प्रभावी शस्त्र
देशाने १०० कोटी लस डोसांचा टप्पा पार करणे हे आरोग्य यंत्रणेचे अभूतपूर्व यश आहे. कोविड प्रतिबंधक लस हेच कोविडविरोधातील प्रभावी शस्त्र आपल्या हाती असून, या माध्यमातून यंत्रणांनी सर्वांना सुरक्षित कवचकुंडल देण्याचे वेगाने प्रयत्न करावेत, अशी आशा आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी जनजागृती करून उर्वरित लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाच्या जनजागृतीसाठी फिरते वाहन, दर्शनी फलक, तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यासही सुचविले आहे. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोविडचे नियम तंतोतंत पाळले जातील याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी. - डॉ. प्रदीप व्यास, अपर सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग