CoronaVirus News : चिंताजनक! राज्यात कोरोनाचे १० हजारांहून अधिक बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 03:14 AM2020-07-12T03:14:29+5:302020-07-12T06:28:21+5:30
राज्यात कोरोनाच्या मृत्यूंनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एकूण १० हजार ११६ बळी गेल्याची नोंद आहे.
मुंबई : राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. शनिवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच ८ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात कोरोनामुळे २२३ बळी गेले. राज्यात कोरोनाच्या मृत्यूंनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एकूण १० हजार ११६ बळी गेल्याची नोंद आहे. सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण २ लाख ४६ हजार ६०० बाधित रुग्ण आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के झाले असून मृत्यूदर ४.१ टक्के आहे. राज्यात अतिजोखमीच्या आजारांमुळे ७० टक्के रुग्णांचे मृत्यू झाले असून ३० टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. एकूण मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष तर ३५ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे.
देशभरात एकाच दिवसात २७,११४ नवे रुग्ण
देशभरात शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे २७ हजार १४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ इतकी झाली आहे.
या संसर्गाने आणखी ५१९ जण मरण पावले असून बळींची संख्या २२ हजार १२३ इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. देशात अवघ्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांवरून आठ लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५,१५,३८६ झाली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ६२.७ टक्के एवढे आहे. देशात सध्या २,८३,४०७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.