Coronavirus: धाडसी माणूस अर्धवट निर्णय घेत नाही; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:33 PM2020-03-21T12:33:07+5:302020-03-21T12:34:04+5:30
महाराष्ट्रात कशाचाच कशावर अंकुश व नियंत्रण नाही.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 63 वर पोहचली आहे. तर दुसरीकडे याच मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनोच्या वाढत्या रुग्ण संख्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात कशाचाच कशावर अंकुश व नियंत्रण नाही. सकाळी पत्रकार परिषद घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम संपलं. राज्यात सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे धाडसी निर्णय घेणारा माणूस अर्धवट निर्णय घेत नाही, असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
तर याचवेळी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री कसली वाट बघत आहात?.. हे सरकार रोज कोरोना रुग्ण किती वाढतायत ह्याची माहिती देण्यासाठीच आहे काय?… विचार करण्यात आणि बोलण्यात वेळ जितका घालवाल तितका त्रास लोकांना भोगावा लागेल, असा आरोपही निलेश राणेंनी केला आहे.
तर राज्यात ११ नवे रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. ज्यात दहा मुंबईचे व एक रुग्ण पुण्याचा आहे. तर ६३ पैकी १३ ते १४ रुग्णांना संपर्कातून कोरोना झाल्याचे स्पष्ट झालं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.