coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 06:53 PM2020-05-04T18:53:57+5:302020-05-04T18:59:27+5:30
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे.
मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण मुंबई, पुण्यात अडकून पडले आहेत. यामध्ये कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावे, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊन यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात राहत असलेल्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान आपल्याला गावी जाऊ द्यावे अशी मागणी मुंबईकर चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप तरी स्पष्ट निर्णय होऊ शकलेला नाही. त्यावरून नितेश राणे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की,’’राज्य सरकारने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबद्दल एकदाच काय ते धोरण निश्चित करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे.’’
राज्य सरकार नी एकदाच काय ते मुंबई मध्ये राहणारे चाकरमानी यांच्या बदल धोरण निश्चित करावे..
— nitesh rane (@NiteshNRane) May 3, 2020
जिल्हा प्रशासन कडून कधी फॉर्म..कधी नाव मागितली जात आहेत..
कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत..
त्या मुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत!!
सरकार नी उशीर होणाया आधी स्पष्टीकरण द्यावे !
दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडलेले नाहीत. तसेच जे रुग्ण सापडले आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई आणि आसपासच्या शहरांतून कोकणात आलेले होते.