Coronavirus: दिलासादायक! 'या' जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही; अधिकाऱ्यांच्या नियोजनांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 08:43 AM2020-04-14T08:43:28+5:302020-04-14T08:48:04+5:30
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे.
कोरोना व्हायरस हे एक जागतिक संकट असून संपूर्ण जग या महामारीचा सामना करत आहे. महाराष्ट्रात तर हे एक युद्ध असल्याचं म्हटलं आहे. या युद्धाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. पंरतु कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढल्याने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला असून मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने पालिकाप्रशासनचं सर्वस्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करीत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. डॉक्टर हे या लढाईत महत्त्वपूर्ण घटक मानला जात आहे. हे दोघेही जिल्ह्याची प्रमुख पदं सांभाळत असले तरी त्यांचे शिक्षण त्यांना या लढाईत मोलाची साथ देत आहे. कारण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे दोघेही डॉक्टर आहेत. तसेच पोलीस यंत्रणा देखील चोखपणे आपले कर्तव्य बजावत आहे. स्थानिक रहिवाश्यांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना विशेष पास देण्यात आला आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारात किंवा अन्य ठिकाणी गर्दी होत नाही.
चंद्रपूर हा एक औद्योगिक जिल्हा आहे. लगतची तेलंगणा आणि छत्तीसगड (गडचिरोलीला जोडून) ही राज्ये या जिल्ह्याला जोडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र-तेलंगणा आणि गडचिरोलीजवळ छत्तीसगड या तीन राज्यांचं केंद्र असलेल्या चंद्रपूरला कोरोनाचा धोका अधिक असणं स्वाभाविक होतं. मात्र आजपर्यंत या जिल्ह्यात एकही रुग्ण न आढळल्याने गावकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे. सोमवारी एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 352 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 980 जण बरे झाले आहेत.