Coronavirus : ...यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:36 AM2021-06-07T07:36:42+5:302021-06-07T07:37:06+5:30
Uddhav Thackeray : ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मांडली.
मुंबई : कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊन उद्योग सुरू करावेत. अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत, त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक करायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन घेईल. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मांडली.
मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे असल्याचे सांगतानाच आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. युकेतील विषाणूसारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, अन्यथा कोरोनाने आपल्याला नॉकडाऊन केले असते, अशा मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितले.
आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, कामगारांचे लसीकरण करून घेणे, पाळ्यांमध्ये काम करणे, वर्क फ्राॅम होमला प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. याशिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
ऑक्सिजन आणताना उद्योजकांचे साहाय्य
राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजननिर्मिती होते. यातील काही उद्योगक्षेत्रांसाठी वापरले जाते. उद्योग क्षेत्राने सहकार्य केल्यामुळे हे सर्व ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरता आले. याशिवाय बाहेरील राज्यातून ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यासाठीही उद्योजकांनी मदत केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सध्या राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागू शकेल, असा अंदाज आहे. ही पूर्तता मिशन ऑक्सिजनअंतर्गत पूर्ण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
बाहेरील कामगारांची नोंद ठेवा
बाहेर राज्यातून येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्यात यावी, तसेच बाहेर राज्यातून आल्यानंतर सात दिवस अलगीकरणात ठेवून त्यांची योग्य तपासणी झाल्यानंतरच त्यांना कामावर घ्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
उद्योजकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार - उद्योगमंत्री सुभाष देसाई
लाॅकडाऊनमुळे उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी लघु व मध्यम उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुविधा देण्यात येतील. मोठे उद्योग समूह आपल्या कामगारांसाठी उपाहारगृहाची सोय देऊ शकतात. मात्र, छोट्या उद्योजकांना ते शक्य नसते.
अशांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५३ उपाहारगृहे चालविण्यात येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणीसाठी शासनातर्फे जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.