coronavirus: 30 एप्रिलपर्यंत कुणालाही भेट नाही, राजभवन कार्यालय महिनाभरासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 05:21 PM2020-03-31T17:21:18+5:302020-03-31T17:21:37+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सुरू असलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ येत्या १४ एप्रिलच्या मध्यरात्री संपल्यानंतर हे सर्वंकष निर्बंध आणखी एक आठवड्याने वाढविण्याची शक्यता
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचं संकट ओळखून मोदींना हा निर्णय घेतला. देशात सोमवारी कोविड-१९ चे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णाचा आकडा २०० पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे, कोरोनाचे संकट अद्यापही देशवासियांना त्रस्त करताना दिसून येत आहे. त्यामुळेच, सर्वच शासकीय कार्यालयातील नागरिकांचा प्रवेश बंद झाला आहे. आता, राज्यपाल राजभवन कार्यालयाकडून ३० एप्रिलपर्यंत हा प्रवेश बंद असल्याचे कळविण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सुरू असलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ येत्या १४ एप्रिलच्या मध्यरात्री संपल्यानंतर हे सर्वंकष निर्बंध आणखी एक आठवड्याने वाढविण्याची शक्यता केंद्र सरकारने सोमवारी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. मात्र, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयाकडून ३० एप्रिलपर्यंतच्या भेटी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात राज्यपाल महोदय यांची राजभवनला जाऊन कुणालाही भेट घेता येणार नाही. राज्यपाल कार्यालयाने याबाबत ट्विटरवरुन माहिती दिलीय.
'राजभवन भेटीची योजना आता दि. ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यासाठी ज्या लोकांनी राजभवनाच्या संकेतस्थळावर राजभवन भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल', असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या बातमीचा आणि लॉकडाऊन वाढण्याच्या वृत्तांचा काहीही संबंध नाही.
राजभवन भेटीची योजना आता दि. ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यासाठी ज्या लोकांनी राजभवनाच्या संकेतस्थळावर राजभवन भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.
— Governor of Maharashtra (@maha_governor) March 31, 2020
कोरोनाच्या संकटामुळे देशभरात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने नागरिकही घराबाहेर पडण्याचं टाळत आहेत. तसेच, देशातील सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाजही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. केवळ, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयांना कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालय, विधानभव आणि राजभवनही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे १४ एप्रिलपर्यंत बंद असलेले राजभवन आता ३० एप्रिलपर्यंत नागरिकांच्या भेटीसाठी बंद राहणार आहे.