Coronavirus : आता लक्ष्य शून्य मृत्यूदराचे, संसर्ग नियंत्रणात; टास्क फोर्ससमोर नवे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 09:18 AM2021-10-15T09:18:25+5:302021-10-15T09:24:54+5:30
Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आला आहे, शिवाय निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्या आटोक्यात असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आला आहे, शिवाय निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्या आटोक्यात असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, तरीही संसर्ग स्थितीवर तज्ज्ञांचे लक्ष असून, आता शून्य मृत्यूदराचे नवे उद्दिष्ट समोर बाळगले असल्याचे मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने मांडले आहे.
कोरोना संसर्गाला वीस महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्ससमोर शून्य मृत्यूदराचे लक्ष्य आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरीही हा विषाणू अजून गेलेला नाही. त्यामुळे गतीने उपचार संशोधन सुरू आहे. या विषाणूचे नवे धोके, लसीकरण, प्रतिपिंडाची निर्मिती या वेगवेगळ्या विषयांवर सतत वैद्यकीय तज्ज्ञांनी चर्चा सुरू आहे.
सध्या कोविड विषाणू संसर्गाचा काळ २ ते ३ आठवडे आहे. संसर्गाचा दुसरा आठवडा अतिशय कठीण असतो, कारण त्या काळात लक्षणे दिसून येतात, तीव्र होण्याचाही धोका असतो. याखेरीज, पोस्ट कोविड सिंड्रोमचा कालावधी १०० दिवसांवर येऊन ठेपला आहे. तिसऱ्या लाटेविषयी डॉ. जोशी यांनी सांगितले, तिसरी लाट ही सौम्य असेल, साधारण डिसेंबर – जानेवारीच्या कालावधीत हा संसर्ग येईल. यावेळेस विषाणूत जनुकीय बदल घडण्याचीही शक्यता आहे.