coronavirus : आता 'त्या' केशरी कार्डधारकांनाही मिळणार रास्त दारात धान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:37 PM2020-04-21T22:37:45+5:302020-04-21T22:38:49+5:30
कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार बंद असल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मुंबई - कोरोना विषाणूचा वाढत फैलाव आणि कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देश आणि राज्यासमोर अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. सर्वच आर्थिक व्यवहार बंद असल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे. मात्र या योजनेचा लाभ केवळ पिवळ्या रेशन कार्डधारक आणि अन्नसुरक्षा योजनेतील पात्र कुटुंबानाच मिळत होता. मात्र केशरी रेशन कार्ड आणि 59 हजार ते 1 लाख उत्पन्न असलेल्यांना हे धान्य मिळत नव्हते. त्यामुळे या लोकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईच्या पार्श्वभूमीवर कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ज्यांचे उत्पन्न ५९ हजार ते १ लाख रूपयांपर्यत असणाऱ्या केशरी कार्डधारकांना ८ रूपये प्रति किलो या दराने गहू आणि १२ रूपये दराने प्रति किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठा विभागाचे संचालक कैसाल पगारे यांनी दिली.