coronavirus : राज्यात कोरोना बाधितांची संख्या 101वर, आणखी चार रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 10:15 AM2020-03-24T10:15:53+5:302020-03-24T10:18:07+5:30
सातारा 1, पुणे 3 अशा 4 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 101वर गेला आहे.
मुंबईः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनानं आतापर्यंत 101 बाधित असल्याचं समोर आलं आहे. सातारा 1, पुणे 3 अशा 4 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 101वर गेला आहे. पुण्यात नवीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, एक सह्याद्री, एक दीनानाथ व एक नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे.
दरम्यान काल राज्यातील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 97वर पोहोचली होती. सांगलीत 4, मुंबईत 3 आणि साताऱ्यात एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली होती. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरून आल्याची माहिती मिळाली होती.
Total number of positive Coronavirus cases in Maharashtra rises to 101 including 3 new cases in Pune and 1 in Satara: Health Department, Maharashtra pic.twitter.com/EHM4hixF1d
— ANI (@ANI) March 24, 2020
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी जनतेशी संवाद साधत राज्यात संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. त्याआधी राज्यात जमावबंदी लागू होती. मात्र तरीही अनेक जण रस्त्यानं प्रवास करत असल्यानं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्यानं संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात येत असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. परिस्थिती सध्या धोकादायक वळणावर असून सर्वांनी घरीच राहावं असं कळकळीचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला केलं.