CoronaVirus राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 05:42 AM2020-05-31T05:42:12+5:302020-05-31T05:42:22+5:30
दिवसभरात ९९ जणांचा मृत्यू। नवीन २९४० बाधितांची नोंद, आतापर्यंत २८,०८१ जण कोरोनामुक्त
मुंबई : राज्यात शनिवारी २९४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ इतकी झाली आहे. यापैकी बरे झालेले आणि मृतांचा आकडा वगळता राज्यातील ३४ हजार ८८१ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ९९ जणांचा मृत्यू झाला असून १०८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण २८ हजार ८१ नागरिक कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रातील रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्णवाढीचा वेग सध्या १७.१ दिवस आहे, तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.०७ टक्के आहे. मृत्यूदर ३.३७ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३५,४२० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील आजच्या ९९ मृतांपैकी सर्वाधिक ५४ मुंबईतील आहेत. याशिवाय, वसई-विरार ७, पनवेल ७, ठाणे ६, रायगड ३, नवी मुंबई २, कल्याण-डोंबिवली २ असे ठाणे आरोग्य मंडळात ८१ मृत्यू आहेत, तर नाशिक मंडळात जळगाव येथील तीन मृतांची नोंद आहे. पुणे मंडळात १२ जणांचा मृत्यू झाला असून यात पुणे मनपा क्षेत्रातील ६ आणि सोलापुरातील ६ जणांचा समावेश आहे. नागपुरात एक तर राजस्थानातील एकाचा पनवेलमध्ये, तर बिहार येथील एकाचा मुंबईत मृत्यू झाला.
आजच्या ९९ मृतांमध्ये ६२ पुरुष तर ३७ महिलांचा समावेश आहे. यातील ४८ जण ६० वर्षे किंवा त्यावरील होते, तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. दोन जण ४० वर्षांखालील आहेत. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्त एकूण मृतांची संख्या २१९७ झाली आहे.