Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १२३ वर पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:40 AM2020-03-26T03:40:00+5:302020-03-26T06:02:55+5:30
coronavirus: पुण्यातील कोरोनाबाधित दाम्पत्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने व ते या संसर्गातून बरे झाल्याने त्यांना नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी आली आणि राज्यातील कोरोनाचे दोन रुग्ण पूर्णपणे बरे होऊन स्वत:च्या घरी परत गेले. रोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असताना बुधवारी मात्र ही संख्यादेखील तीनने कमी झाली. मंगळवारी १८ रुग्ण आढळले होते ती संख्या आज १५ वर आली.
पुण्यातील कोरोनाबाधित दाम्पत्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने व ते या संसर्गातून बरे झाल्याने त्यांना नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी ही चांगली बातमी आल्यामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असा संदेश नागरिकांमध्ये जण्यास मदत झाली आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदन केले. मंगळवारी मुंबई आणि औरंगाबाद येथील बरे झालेल्या रुग्णांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात १५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आता कोरोनाबाधितांची संख्या १२३ झाली आहे.
नवीन बाधित रुग्णांपैकी सांगलीचे ५ रुग्ण हे काल बाधित आढळलेल्या ४ रुग्णाचे निकट सहवासित आहेत. नवी मुंबईतील ५७ वर्षीय पुरुष हा यापूर्वी कोरोनाबाधित आढळलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या फिलीपाईन नागरिकाच्या संपर्कातील आहे.