coronavirus: चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधितांचे प्रमाणही वाढतेच, राज्यात १९, तर देशात प्रमाण ७.०९ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:30 AM2020-07-09T03:30:55+5:302020-07-09T03:31:01+5:30
पुणे - देशातील कोरोना निदान चाचण्यांत पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण २० जूननंतर वाढले व सध्या ते ७.०९ टक्के आहे. ...
पुणे - देशातील कोरोना निदान चाचण्यांत पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण २० जूननंतर वाढले व सध्या ते ७.०९ टक्के आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १९ टक्क्यांपर्यंत आहे तर मुंबईत हेच प्रमाण तब्बल २४ टक्क्यापर्यंत आहे.
कोरोना निदान चाचण्यांचे प्रमाण जसजसे वाढत जात आहे तस तसे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेटमुळे साथीचे संक्रमण किती प्रमाणात झाले आहे, हे समजण्यास मदत होते. रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याच्या प्रमाणात वाढ ही कोरोना निदान चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने होत आहे. कोणती लक्षणे आढळल्यावर ही चाचणी घेतली जावी, याचे ठराविक निकष अनेक राज्यांत अजूनही आहेत. त्यामुळे लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचीच मोठ्या प्रमाणात चाचणी घेतली जाते व त्यात कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण वाढते.
कोरोना निदान चाचण्यांचे निकष शिथील करून लक्षणे दिसणारे, न दिसणाºया सर्वांचीच जर चाचणी घेतली तर रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होईल. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मुंंबईत लक्षणे आढळणारे रुग्ण किंवा वैद्यकीय तज्ञांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर शिफारस केलेल्या रुग्णांशिवाय इतरांचीही कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.