Coronavirus: आता RTPCR चाचणी ३५० रुपयांत; ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:37 AM2021-12-07T05:37:27+5:302021-12-07T09:29:17+5:30
आरटी-पीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारा पीपीई, प्रवास खर्च, किट याचा एकत्रित खर्च यात अंतर्भूत आहे.
मुंबई : राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना आता सार्वजनिक आरोग्य विभागाने पुन्हा आरटी-पीसीआर चाचण्यांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रुपयांवरून ३५० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपिड अँटिजन अँटिबॉडीज तपासणीचे दरदेखील कमी करण्यात आले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णयदेखील जाहीर केला आहे.
घरी येऊन नमुने घेतल्यास जुने दर - ८००/- नवे दर - ७००/-
नमुने प्रयोगशाळांत आणण्याचा खर्च जुने दर - ६००/- नवे दर- ५००/-
आरटी-पीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारा पीपीई, प्रवास खर्च, किट याचा एकत्रित खर्च यात अंतर्भूत आहे.
समितीच्या अभ्यासानंतर दर निश्चिती
आयसीएमआर व एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर तपासणीच्या दरनिश्चितीसाठी समिती स्थापन केली होती. या समितीने खासगी प्रयोगशाळांशी चर्चा करून आरटीपीसीआर तपासणीसाठी आकारायच्या दराबाबतचा अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानुसार ही दरनिश्चिती करण्यात आली.
सातव्यांदा दरात कपात
राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या दरात सातव्यांदा कपात केली आहे. सुरुवातीला ४५००/- वरून राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे १२००/-, १९८०/-, १७००/- केली होती.