Coronavirus : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील एक महिना काळजीचा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:05 PM2020-03-18T12:05:20+5:302020-03-18T12:11:15+5:30
काळजी घेणे; इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून गर्दीत जाणे टाळावे
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुढील महिनाभराचा कालावधी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. भारतात सध्या केवळ परदेशातून आलेले किंवा त्यांच्या थेट संपर्कात आलेले यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप समाजामध्ये इतरांना लागण झालेली नाही. कोरोनाचा असा प्रसार होऊ नये म्हणून पुढील १५ दिवसांत परदेशातून आलेले किंवा त्यांच्या संपर्कातील सर्वांना रुग्णालय किंवा घरी विलग करणे, तसेच इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. तर, त्यापुढील १५ दिवसांत समाजामध्ये विषाणूचा संसर्ग किती होईल, यावर सर्व काही अवलंबून राहील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
जगभरात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत आहे; पण भारतात अजूनही त्याचा प्रभाव वाढलेला नाही. सध्या केवळ परदेशातून आलेले आणि त्यांच्या थेट संपर्कात आलेले यांनाच लागण झालेली आहे. या साथीच्या आजाराच्या संसर्गाचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांनाच कोरोना विषाणूची लागण होणे, तर दुसºया टप्प्यात त्यांच्यामुळे त्यांचे नातेवाईक व थेट संपर्कात आलेले यांना लागण होते. सध्या भारत दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तिसºया टप्प्यामध्ये या दोन्हींव्यतिरिक्त इतर व्यक्तींमार्फत प्रसार होतो. सध्या अनेक देश या टप्प्यामध्ये आले आहेत. त्याला आळा घालणे सहज शक्य होत नाही. यामध्ये विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होतो. त्यामुळे दुसºया टप्प्यातच प्रभाव कमी करणे खूप गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये गर्दी कमी करणे, लोकांचा इतरांशी थेट संपर्क थांबविणे हे महत्त्वाचे आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यासह इतर आस्थापनांवरही अनेक बंधने घातली आहेत. याविषयी ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन त्याची लक्षणे समोर येण्याचा कालावधी २ ते १४ दिवसांचा आहे. त्यामुळे परदेशातून आलेले किंवा त्यांच्या थेट संपर्कातील सर्वांना किमान १४ दिवस विलग ठेवणे आवश्यक आहे. या कालावधीत त्यांच्यामध्ये लक्षणे आढळल्यास त्यानुसार रुग्णालयात पुढील १४ दिवसांसाठी विलग केले जात आहे. सध्या आपण दुसऱ्या टप्प्यावर असल्याने तिथेच त्याचा प्रसार रोखणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.’’
..........
प्रसार किती होतोय यावर सर्व अवलंबून
पुण्यातील एका राष्ट्रीय संस्थेतील शास्त्रज्ञांनीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुढील एक महिना महत्त्वाचा असल्याचे सांगितले. भारतातील लोकसंख्येची घनता पाहता, कोरोनाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने होऊ शकतो. त्यामुळे पुढील १५ दिवस अधिकाधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर १५ दिवसांत समाजामध्ये याचा प्रसार किती होतोय, यावर खूप अवलंबून आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
.........
भारताच्या तुलनेत अन्य देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव वेगाने वाढला आहे. यापैकी काही देशांमधील आठवडा निहाय (रुग्ण सापडू लागल्यानंतर) रुग्णसंख्या
आठवडा न्यूयॉर्क फ्रान्स इराण इटली स्पेन भारत
पहिला २ १२ २ ३ ८ ३
दुसरा १०५ १९१ ४३ १५२ - २४
तिसरा ६१३ ६५३ २४५ १०३६ ६७४ १०५
चौथा - ४,४९९ ४,७४७ ६,३६२ ६,०४३ -
पाचवा - - १२,७२९ ५१,१५७ - -
........................
पुढील १५ दिवसांत परदेशातून आलेले व त्यांच्या निकटवर्तीयांकडून प्रसार न झाल्यास आपण तिसऱ्या टप्प्यातील प्रभाव कमी करू शकू. त्यानंतरचे १५ दिवस या टप्प्यातील प्रमाण कमी करणे शक्य होईल. अन्यथा, संसर्ग रोखणे खूप कठीण होईल. यामुळे प्रत्येकाने याकडे गांभीर्याने पाहून गर्दी न करणे, गर्दीत जाणे टाळायला हवे.- डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता, ससून रुग्णालय