CoronaVirus News: कोरोना संकटात शाळा सुरू करायच्या का?; ३३ टक्के पालक म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:59 AM2020-08-11T07:59:26+5:302020-08-11T07:59:40+5:30

पालकांचा अल्प प्रतिसाद : संसर्गाची भीती कमी होत असल्याचेही निरीक्षण

CoronaVirus Only 33 percent of parents support starting a school | CoronaVirus News: कोरोना संकटात शाळा सुरू करायच्या का?; ३३ टक्के पालक म्हणतात...

CoronaVirus News: कोरोना संकटात शाळा सुरू करायच्या का?; ३३ टक्के पालक म्हणतात...

Next

मुंबई : कोरोना पूर्णत: हद्दपार झाल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नयेत, अशी भूमिका जवळपास ९६ टक्के पालकांनी महिनाभरापूर्वी घेतली होती. मात्र, सरकारने १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे संकेत दिल्यानंतर त्याला ३३ टक्के पालकांनी सहमती दर्शवली आहे, तर ५८ टक्के पालकांचा तूर्त शाळा सुरू करण्यास विरोध आहे. उर्वरित पालकांना या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेता आलेली नाही.

लोकल सर्कल या नामांकित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील हे निरीक्षण असून तो अहवाल केंद्र आणि राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून देशातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिक्षणात खंड पडू नये यासाठी आॅनलाइन पद्धतीने विद्यादान सुरू असले तरी त्यावर बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे परंपरागत पद्धतीने शिक्षण सुरू करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. १ सप्टेंबरपासून दहावी, बारावी आणि त्यानंतर १५ दिवसांनी सहावी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. याबाबत लोकल सर्कलने देशातील २५ हजार पालकांची मते अजमावली.

कोरोना प्रादुर्भावाच्या दहशतीमुळे बहुसंख्य पालकांनी शाळा सुरू करण्यास विरोध कायम ठेवला आहे. शाळेत सामाजिक अंतर पाळणे अशक्य आहे, तेथे संक्रमण झपाट्याने होईल, शाळेतून झालेले संक्रमण आणि त्यामुळे शाळेतून घरी आलेल्या मुलांमुळे घरातील ज्येष्ठांमध्येही संसर्गाचा धोका वाढेल, अशी भीती ४७ टक्के पालकांना वाटते. तर, दोन टक्के पालकांना सध्याच्या परिस्थितीत आॅनलाइन शिक्षणाचाच पर्याय उत्तम वाटत आहे.

ग्रामीण भागातील शिक्षणाची चिंता
ग्रामीण भागातील तसेच आॅनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरही या सर्वेक्षणात चर्चा झाली. सरकारने दूरदर्शन, रेडिओच्या माध्यमातून शिक्षण द्यावे.
आॅनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली उपकरणे स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी सरकारसह कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातूनही निधी संकलन करावे, असे मतही या सर्वेक्षणात पालकांनी व्यक्त केले.

परदेशातील अनुभव वाईट : अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर तिथले अनेक विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे अनेकांना क्वारंटाइन व्हावे लागले होते. इस्रायलने सर्वप्रथम शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, काही दिवसांतच शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर, विद्यार्थ्यांना होणारा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्ण शैक्षणिक वर्ष शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केनिया सरकारने घेतला आहे.

Web Title: CoronaVirus Only 33 percent of parents support starting a school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.