Coronavirus : सरकारी कार्यालयांत एका दिवशी ५० टक्केच कर्मचारी, एक दिवसाआड कामाची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 06:45 AM2020-03-19T06:45:54+5:302020-03-19T06:47:19+5:30
कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळेल त्यांनी त्यांची प्रलंबित राहिलेली कामे उपस्थितीच्या दिवशी करावी लागतील. हा आदेश ३१ मार्चपर्यंत आहे.
मुंबई : कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यापुढे राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्केच उपस्थिती राहील. हा आदेश तत्काळ
लागू केला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाआड कार्यालयात जायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ज्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळेल त्यांनी त्यांची प्रलंबित राहिलेली कामे उपस्थितीच्या दिवशी करावी लागतील. हा आदेश ३१ मार्चपर्यंत आहे. मात्र सार्वजनिक आरोग्य तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व त्यांच्या सर्व कार्यालयांना हा आदेश लागू नसेल. क्षेत्रीय स्तरावर ज्या अधिकारी, कर्मचाºयांना कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते (फिल्ड वर्क) अशा कार्यालयांना त्याचप्रमाणे आपत्कालीन/अत्यावश्यक सेवा
देणा-या कार्यालयांनासुद्धा हा आदेश लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विश्वास काटकर यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
रेल्वे, बसमध्ये ५० टक्केच प्रवासी
रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये बेस्टमध्ये प्रवाशांना उभे राहण्याची परवानगी नसेल.. तसेच प्रवाशांना एकमेकांपासून काही अंतरावर बसावे यासाठी तशा सूचना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.
देशातील रुग्णांची संख्या 168
महाराष्ट्र ४५ । केरळ २५ । उत्तर प्रदेश १५ । कर्नाटक १३
दिल्ली ९ । लडाख ८ । तेलंगणा ४ । राजस्थान २
जम्मू-काश्मीर ३ । पंजाब, उत्तराखंड, ओदिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल : प्रत्येकी १
128
भारतीय एकूण १५५ बाधितांमध्ये महाराष्ट्र, केरळ, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली व राजस्थान या राज्यांत लागण झालेले २४ परदेशी नागरिक आहेत.
राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण;मुंबई-पुण्यामध्ये दोन नवे
मुंबई : राज्यात बुधवारी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व रत्नागिरी येथे प्रत्येकी एक अशा ४ कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. पुण्यातील ३२ वर्षीय महिला नेदरलँडहून दुबईमार्गे पुण्यात आली आहे, तर मुंबईच्या घाटकोपर येथील ६८ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
बुधवारी ५८ संशयित रुग्णांना दाखल केले. परदेशांतून १,२२७ प्रवासी आले. ताप, सर्दी, खोकला या लक्षणांमुळे विलगीकरण कक्षात १८ जानेवारीपासून ९५८ जणांना दाखल केले. त्यांपैकी ८६५ जणांचे नमुने निगेटिव्ह, तर ४५ जणांचे पॉझिटिव्ह आहेत.
कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. देशातील सर्व विमानतळांवर प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात असून, कोरोनाची लक्षणे आढळणाºया प्रवाशांना विलगीकरण कक्षात नेण्यात येत आहे. बाधित देशांमधून महाराष्ट्रात आलेल्या १,२२७ पैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा व तपासण्या पूर्ण झाल्या आहेत.
विदेशात २७६ भारतीयांना कोरोना
नवी दिल्ली : विदेशात २७६ भारतीयांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून त्यामध्ये इराणमधील २५५, संयुक्त अरब अमिरातीमधील १२, इटलीतील ५ व हाँगकाँग, कुवेत, रवांडा, श्रीलंकेतील प्रत्येकी एका भारतीयाचा समावेश आहे, असे केंद्र सरकारने लोकसभेत बुधवारी सांगितले.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये आठ भारतीय क्वारंटाइनमध्ये आहेत, इराणमध्ये सहा हजारपेक्षा जास्त भारतीय राहतात. कोरोनाच्या साथीमुळे अनेक भारतीय अरब देश व इराणमध्ये अडकून पडले आहेत. इराणमध्ये यात्रेसाठी गेलेल्या १,१०० भारतीयांमध्ये बहुतांश रहिवासी लडाख, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र येथील आहेत. जम्मू-काश्मीरचे ३०० विद्यार्थी इराणमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. केरळ, गुजरात, तामिळनाडू व इतर राज्यांतील सुमारे १ हजार मच्छीमार नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने इराणमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करून आहेत.