CoronaVirus News: मार्च ते सप्टेंबरदरम्यान रुग्ण निदानाचा आलेख चढाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 03:38 AM2020-10-05T03:38:46+5:302020-10-05T06:51:54+5:30
CoronaVirus News: मृत्युदर घटला; कोरानाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले
मुंबई : राज्यात मार्चात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून देशातील सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्युदरात महाराष्ट्र पुढे असल्याचे दिसून आले होते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात देशाच्या तुलनेत ४० टक्के संसर्ग राज्यात असल्याचे दिसून आले होते, आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, हे प्रमाण आता ४० टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आले आहे.
ऑगस्ट महिन्यात स्थिरावलेल्या कोरोनाच्या स्थितीने सप्टेंबरच्या पंधरवड्यात उसंडी मारली. या काळात अगदी १२ ते २२ हजारांवर दररोजच्या रुग्ण निदानाचा आलेख पोहोचला.
याविषयी टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, मागच्या काही महिन्यांच्या तुलनेत राज्यभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे राज्यात दैनंदिन रुग्ण वाढ अधिक दिसून येते. परंतु एकूणच कोरोनाच्या मृत्युंमध्ये घट झाली असून, ही समाधानकारक स्थिती आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे, तर दुसºया बाजूला रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून, सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणही २.६ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ.साधना तायडे यांनी सांगितले की, सध्या राज्यात कोरोना चाचण्यांची क्षमता दुप्पट करण्याचे काम सुरू आहे, तसेच मृत्युदर १ टक्क्यांच्या खाली आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिवाय, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही १० टक्के असल्याने, त्याविषयी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या निर्देशानुसार, विश्लेषण करण्यात येत आहे.
कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढ
मुंबईत ३ फेब्रुवारी, २०२०ला पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. ३ फेब्रुवारी ते ६ मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एक लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला, तर १ जूनला दोन लाख चाचण्यांचा टप्पा पार करण्यात आला. त्यानंतर, २४ जून रोजी ३ लाख चाचण्या पार पडल्या. १४ जुलै रोजी ४ लाख चाचण्या पूर्ण केल्या. २९ जुलैपर्यंत ५ लाख चाचण्या पार पडल्या होत्या, तर २३ आॅगस्टला चाचण्यांची संख्या ७ लाख झाली, तसेच २९ सप्टेंबरपर्यंत हीच संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे.