CoronaVirus: तासाहून अधिक वेळ वाचले जाते वृत्तपत्र; सर्वेक्षणातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:14 AM2020-04-25T06:14:10+5:302020-04-25T07:02:40+5:30
लॉकडाउनकाळात वृत्तपत्रांच्या वाचनाचा वेळही वाढला
नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाउनच्या काळात विश्वासार्ह माहिती व बातम्यांसाठी लोक वृत्तपत्रांनाच अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच सध्या वाचकांनी वृत्तपत्र वाचण्याच्या वेळेत दररोज आणखी २२ मिनिटांची वाढ झाली आहे. वाचक आता तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र बारकाईने वाचतात. हा निष्कर्ष एका सर्वेक्षणाच्या आधारे काढण्यात आला आहे. अॅडव्हान्स फिल्ड अॅण्ड ब्रँड सोल्युशन्स या मार्केट रिसर्च कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. लॉकडाउन लागू होण्याच्या आधी वाचक वृत्तपत्राचे वाचन सरासरी ३८ मिनिटांपर्यंत करत असे.
विश्वासार्ह बातम्या आणि माहितीसाठी विश्वास वृत्तपत्रांवरच
वृत्तपत्रे ही विश्वासार्ह माहिती व बातम्या मिळविण्याचा स्रोत आहे. वृत्तपत्र ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे सध्याच्या आव्हानात्मक काळात पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्याचे हे महत्त्व पुढील काळातही अबाधित राहून आणखी वाढणार आहे, असेही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या वाचकांपैकी 40% लोकांनी सांगितले की, ते आता सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचतात. लॉकडाउनच्या आधी १६ टक्के लोकच एक तासापेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचत असत.
जे लोक पूर्वी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचत असत त्यांची संख्या आता ४२ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. जे वाचक १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ वृत्तपत्र वाचत होते त्यांची संख्या १४ टक्के होती. आता त्यात घट होऊन ते प्रमाण ३ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच ते आता अधिक वेळ वृत्तपत्र वाचतात.
या सर्वेक्षणात आढळून आले की, ४२ टक्के लोक रोजचे वृत्तपत्र एकदा नव्हे तर त्यापेक्षा जास्त वेळा हाती धरून त्यातील विविध प्रकारच्या बातम्या अधिक लक्षपूर्वक वाचतात.