Coronavirus : राज्यातील तीर्थस्थाने भाविकांसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:17 AM2020-03-17T05:17:40+5:302020-03-17T05:18:14+5:30

ब-याच ठिकाणी होणा-या चैत्रयात्रा, चैत्रोत्सवाचे कार्यक्रमही स्थगित केले आहेत.

Coronavirus: Pilgrims in the state closed to devotees | Coronavirus : राज्यातील तीर्थस्थाने भाविकांसाठी बंद

Coronavirus : राज्यातील तीर्थस्थाने भाविकांसाठी बंद

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अखत्यारीत येणा-या तीर्थस्थानांच्या देवस्थान सस्थान, समिती यांच्याबरोबर तातडीने बैठक घेऊन भाविकांसाठी बंद ठेवली आहेत. ब-याच ठिकाणी होणा-या चैत्रयात्रा, चैत्रोत्सवाचे कार्यक्रमही स्थगित केले आहेत.

सिद्धिविनायक मंदिर बंद
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान न्यासाने घेतला आहे.

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर बंद
मुंबादेवी अणि महालक्ष्मी मंदिर ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे.

पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, महडच्या गणपतीचे दर्शन बंद
पाली : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर, खालापूर तालुक्यातील महड वरदविनायक मंदिर, उरण तालुक्यातील घारापुरी लेणी नागरिकांना प्रवेशासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
रायगड जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार रविवारी रात्री ८.३० वाजता बल्लाळेश्वर मंदिर बंद केले.

सप्तश्रृंग गडावरील चैत्रोत्सव रद्द
साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंग देवी गडावरील चैत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.
नृसिंहवाडीतील दत्तमंदिर बंद
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर बंद राहणार आहे. दत्त देवस्थान, ग्रामपंचायत यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तुळजाभवानी मातेचे मंदिर बंद
श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी सोमवारी पुजारी मंडळाच्या बैठकीत दिली.

पंढरपुरात पंगत बंद
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अन्नछत्रातील महाप्रसादाची पंगत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता फूड पॅकेटच्या स्वरुपात प्रसाद देण्यात येणार आहे.

श्रीक्षेत्र माहूर, गुरुद्वाराही बंद
नांदेडमधील ऐतिहासिक श्री सचखंड गुरुद्वारा आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूरचे रेणुकामाता मंदिरही बंद ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ विपीन ईटणकर यांनी सांगितले़

शेगावचा रामनवमी उत्सवही स्थगित
शेगाव (बुलडाणा) : येथील श्री गजानन महाराज मंदिरातील ‘श्रीं’ची दर्शन सुविधा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. याशिवाय २ एप्रिल रोजी आयोजित श्री रामनवमी उत्सवसुद्धा स्थगित केला आहे.

Web Title: Coronavirus: Pilgrims in the state closed to devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.