CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:25 AM2020-06-18T04:25:52+5:302020-06-18T06:55:07+5:30
शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे
ठाणे : आशिष शेलार तत्वज्ञानी आणि हुशार आहेत. त्यांनी जी टीका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली, त्यांचा राजीनामा मागितला, तेच गणित भाजपने नरेंद्र मोदींच्या बाबतीत वापरुन त्यांचाही राजीनामा घ्यावा, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते शेलार यांना बुधवारी लगावला.
सोमवारी शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र सरकारने काय केले, एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात काय केले, अशी टिका करण्यापूर्वी त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण रेट बघावे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी राज्याला एक दमडी दिली नाही आणि नको तो गवगवा केला जात आहे. परिस्थिती काय आहे, त्यात कशाप्रकारे बोलले पाहिजे, याचेही भान भाजप नेते हरवून बसले आहेत. यात माणसुकीचा धर्म बघायचा की यातही राजकारण करत बसायचे, असा सवाल त्यांनी केला.
भाजपला सगळीकडे व्यवहार दिसतात, कारण ते धंदेवाईकच आहेत. म्हणूनच भाजपला शेठजींची पार्टी बोलले जाते. त्यांच्या डोक्यात नेहमीच व्यवहार असतात अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांचे आकडे लपविले जात असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप खोटा आहे. वास्तविक पाहता, पहिल्या दोन महिन्यात लॅब कमी होत्या. त्यामुळे रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला तर तो पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह, हे समजत नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना रुग्णसंख्या परत मोजायला लावली. फडणवीसांचे मंत्रालयात कोण खबरी आहेत, त्यांना कसे कागद पुरविले जातात, याची आम्हाला माहिती असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.
चीनच्या हल्यात १९६७ नंतर २0२0 मध्ये जवानांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता देशाने लाल डोळे दाखविण्याची वेळ आली आहे. मोदींनी आक्रमकता दाखवावी. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिल, असे आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजकारण करण्याची ही वेळ नाही - एकनाथ शिंदे
सध्याच्या परिस्थितीत सर्वानी एकजूट होऊन काम करण्याची आहे. कोणीही राजकारण करु नये, असा टोला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ठाणे जिल्ह्यात प्रशासनाबरोबर सर्व जण काम करत आहेत. कोणालाही बेडची कमतरता भासणार नाही. जास्तीत जास्त बेडची व्यवस्था तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.