CoronaVirus: कोरोनाग्रस्त पोलिसांवर मोफत उपचार; महासंचालकांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:22 AM2020-04-23T04:22:37+5:302020-04-23T04:24:44+5:30
कोरोनाचा महाराष्ट्र पोलीस आरोग्य कुटुंब योजनेत समावेश
- जमीर काझी
मुंबई : कोविड - १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढणाऱ्या पोलिसांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्यास त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जाणार आहेत.
पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत या विषाणूचा समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत सर्व रुग्णालये आणि पोलीस घटक प्रमुखांना कळविण्यात आले आहे.
आतापर्यंत ६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पोलिसांना होणारा संसर्ग यामुळे या विषाणूचा समावेश अत्यावश्यक बाब म्हणून योजनेत करण्याचा निर्णय पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतला आहे.
पोलीस दलाच्या यादीत असलेल्या राज्य भरातील विविध जिल्हावार रुग्णालयामध्ये कोविड - १९ संदर्भात उपचार केले जातील. त्यासाठी संबंधितांना केवळ आपल्याकडील आरोग्य योजनेचे कार्ड दाखवावे लागेल.
सदैव कामाची दगदग आणि तणावाखाली वावरणाºया पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नाही. हे लक्षात घेता १५ वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत औषधोपचार उपलब्ध करून देणारी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित केली. यात विविध २८ आजार व ५ गंभीर स्वरूपाच्या व्याधीचा समावेश आहे. कोरोनाबाधित पोलिसांना आर्थिक मदत म्हणून तातडीने एक लाख रुपये अग्रिम स्वरूपात देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. मात्र, ही रक्कम ठरावीक हप्त्यात बिनव्याजी परत करावी लागेल. त्यामुळे पोलिसांना ठोस मदत व विनामूल्य उपचार मिळावेत यासाठी मोफत आरोग्य कुटुंब योजनेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
६४ पोलिसांना लागण
आतापर्यंत १२ पोलीस अधिकारी व ५२ पोलीस कर्मचारी मिळून ६४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १३४ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक झाली आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी प्रयत्नशील असताना काही अधिकारी, अंमलदारांना त्याची लागण झाली आहे. त्यांच्यावर विनामूल्य उपचार होण्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून कोविंड-१९ चा महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत समावेश केला आहे.
- संजीव कुमार सिंघल,
अप्पर पोलीस महासंचालक, प्रशासन