coronavirus: रायगडावरील सोहळा होण्याची शक्यता धूसर; मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:39 AM2020-05-11T05:39:48+5:302020-05-11T05:40:28+5:30
कोरोनामुळे शिवभक्तांना इच्छा असूनही गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्यासाठी ते योग्यही आहे. गेली अनेक दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी बोलत आहे.
कोल्हापूर : गेली चौदा वर्षे राजवैभवात साजऱ्या होणा-या ६ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर यंंदा ‘कोरोना’चे संकट आले आहे. हा संसर्ग अजून किती वाढेल? लॉकडाउनचा कालावधी किती दिवस राहील? किती शिवभक्तांना गडावर जाण्याची परवानगी मिळेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून मेअखेर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी पत्रकातून दिली.
कोरोनामुळे शिवभक्तांना इच्छा असूनही गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्यासाठी ते योग्यही आहे. गेली अनेक दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी बोलत आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. हा सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल, अशी सोय करण्याचा मानस असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकात म्हटले आहे.