CoronaVirus News: पुण्यातील मंडळांचे ‘आरोग्यपूर्ण’ पाऊल; मंदिरांमध्येच प्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:32 AM2020-08-12T04:32:51+5:302020-08-12T04:34:21+5:30

रस्त्यावर ना मंडप, ना देखावा; घरीच मूर्ती बसवून घरीच विसर्जन

CoronaVirus Pune Circles 'Healthy' Steps; Installation in temples only | CoronaVirus News: पुण्यातील मंडळांचे ‘आरोग्यपूर्ण’ पाऊल; मंदिरांमध्येच प्रतिष्ठापना

CoronaVirus News: पुण्यातील मंडळांचे ‘आरोग्यपूर्ण’ पाऊल; मंदिरांमध्येच प्रतिष्ठापना

Next

पुणे : कोरोनामुळे शहरातील गणेश मंडळांनी ‘आरोग्यदायी’ निर्णय घेतला असून, पन्नास मंडळे रस्त्यावर मंडप उभारणार नाहीत, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना करणार आहेत. महापालिकेनेही घरीच मूर्ती बसवून घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.

यंदा बाबू गेनू, हत्ती गणपती, छत्रपती राजाराम मंडळ या प्रमुख मंडळांसह कोथरूड, बिबवेवाडी आदी उपनगरांमधील जवळपास पन्नास गणेश मंडळांनी एकत्र येत मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरांमध्येच श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्याचे त्यांनी ठरवले आहे. याआधी प्रशासनाने साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या वतीने शहरातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला.
मंदिरामध्ये छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. ‘लाइव्ह दर्शन’ सुुरू करण्याचाही मंडळांचा मानस आहे.

असे करा घरच्या घरी विसर्जन
गणेशोत्सवात नागरिकांना घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जन करता यावी, यासाठी पुणे महापालिका यंदा तब्बल १५० टन अमोनियम बायकार्बोनेट घेणार आहे.
क्षेत्रीय कार्यालय आणि गणेशमूर्ती विक्री केंद्राच्या माध्यमातून ते वितरित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.

कोथरूड, येरवडा, बिबवेवाडीसह काही गणेश मंडळांनी दहा दिवस उत्सव काळातले कार्यक्रम मंडप न करता मंदिरात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांमुळे पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. मंदिरातली विसर्जनाची मूर्ती आम्ही मंदिरातच विसर्जन करणार आहोत. इतर मंडळांनीही याचे अनुकरण करावे.
- श्याम मानकर, हत्ती गणपती मंडळ

यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव मुख्य मंदिरात होणार आहे. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, १२७ वर्षांत यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होणार आहे.
- अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

लालबागचा राजा, जीएसबी मंडळांचा गणेशोत्सव रद्द
मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे मोठ्या मूर्ती, देखावे, महाआरती, आगमन आणि विसर्जनाच्या थाटातील मिरवणुका, समुद्राशी स्पर्धा करणारी गणेशभक्तांची गर्दी. हे सगळे यावर्षी कोरोनामुळे दिसणार नाही. शहर-उपनगरातील तीन मंडळांनी गणेशोत्सव रद्द करून अन्य उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात लालबागचा राजा, जीएसबी गणेशोत्सव मंडळ (वडाळा) आणि शिवाजी पार्क येथील मंडळाचा समावेश आहे. याशिवाय, अन्य सर्व गणेशोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार असून उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करतील. त्याचप्रमाणे, या उत्सवादरम्यान सामाजिक भान राखत आरोग्यविषयक उपक्रमही साजरे करण्यात येतील. राज्य शासन-पालिकेने घालून दिलेल्या नियमांचेही पालन करण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली.

नाशिकमध्ये ‘व्हीआयपी आरती’ नाही
नाशिक : नाशिक गणेश महामंडळाने शहरात कोणत्याही मंडळाकडून ‘व्हीआयपी आरती’ केली जाणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. त्याऐवजी मंडळाच्या दोन-दोन पदाधिकाऱ्यांना आरतीचा दरदिवशी मान दिला जाणार आहे.

सोलापुरात शाडूच्या मूर्ती
सोलापूर : शहरातील सर्व मध्यवर्ती मंडळांनी यंदा रस्त्यावरील मंडप तसेच मिरवणूक आदी गोष्टींना पूर्णपणे फाटा दिला आहे. तसेच ‘लोकमत’च्या माध्यमातून ‘घरोघरी शाडूची मूर्ती’ ही चळवळही अनेक गणेशोत्सव मंडळांकडून उत्स्फूर्तपणे राबवली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात
३00 गावात ‘एक गाव - एक गणपती’ उत्सव
कोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांनी ‘एक गाव - एक गणपती’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या उत्सवावर होणारा खर्च सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील २०हून अधिक मंडळांची मूर्ती २१ फूट उंच असते; परंतु यंदा फक्त चार फूटच मूर्ती बसवून उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी जाहीर केला आहे.

मोठ्या मूर्तीची पूजा; जेथे आहे तेथेच!
औरंगाबाद : शहरात ७ गणेश मंडळे दरवर्षी १२ ते १७ फूट उंचीची गणेश मूर्ती बसवतात. काही मंडळे मागील अनेक वर्षांपासून एकच मूर्ती बसवितात. मात्र, यंदा त्या मूर्ती सध्या जेथे ठेवण्यात आल्या आहेत तेथेच त्याची पूजा, आरती करण्यात येईल. मंडपात ४ फुटांपर्यंतची गणेश मूर्ती बसविण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. राजाबाजार येथील देवडीचा राजा गणेश मंडळाची मूर्ती १७ फूट उंचीची आहे. इतर मंडळांत ४ फूट मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा के ली जाईल. काही मंडळांनी यंदा लालबागच्या राजाची ४ फुटांची मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: CoronaVirus Pune Circles 'Healthy' Steps; Installation in temples only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.