Coronavirus: क्वारंटाईन सेंटर करता येईल तंत्रस्रेही अन् लोकस्रेही; तरुणांनी तयार केले डिझाईन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:35 PM2020-05-07T23:35:57+5:302020-05-07T23:36:12+5:30
केंद्र तसेच राज्य सरकारला प्रस्ताव सादर
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : सध्याची विलगीकरण कक्षांची बिकट अवस्था लक्षात घेता स्मार्ट सिटी प्रकल्पात यापूर्वी कार्यरत असलेले ईशान केसकर यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने विलगीकरण कक्ष ‘तंत्रस्रेही’ आणि ‘लोकस्रेही’ कसे होतील, यासंबंधीचा प्रकल्प डिझाईन केला आहे. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून विलगीकरणात जात असलेल्या नागरिकांना आधीच माहिती मिळेल व कोणत्या सुविधा पुरवता येतील, अशी अनोखी संकल्पना मांडली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री कार्यालय यांना याबाबत माहिती देणारे ई-मेल पाठवले आहेत. ट्विटरच्या माध्यमातूनही शासनाला याचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही हा प्रकल्प सादर केला असून, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये महापालिका आयुक्तांशी या संदर्भात बैठक होणार आहे.
पुढील काही काळात प्रत्येक राज्यातील किमान १०-१५ लाख लोकांना क्वारंटाईन करावे लागू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, विलगीकरण कक्षातील असुविधा लक्षात घेता, सामान्य लोकांच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. विलगीकरण कक्षातील असुविधा, समाजापासून दूर जाण्याची भीती, परिस्थितीबाबतची अनभिज्ञता, अनेक शंका आणि त्यातून येणारी नकारात्मकता यामुळे सामान्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूरगामी परिणाम टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊ शकतो, असे ईशान केसकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
केसकर म्हणाले, ‘‘सध्या शासनाला अनेक आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे विलगीकरणात दर्जेदार सुविधा देणे शक्य नाही. मात्र, चांगल्या खाटा आणि वैयक्तिक सामान ठेवण्यासाठी स्टोअरेजची सुविधा नक्कीच पुरवली जाऊ शकते. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून क्वारंटाईनची प्रकिया सुलभ केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला क्वारंटाईनसाठी कोणत्या ठिकाणी जायचे आहे, तेथे जाण्यासाठी वाहतुकीची काय व्यवस्था आहे अशी माहिती मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आधीच देता येऊ शकते. याच अॅप्लिकेशनमध्ये विविध भाषांमधील ई-बुक्स, आध्यात्मिक आशयाचे साहित्य, योगाची प्रात्यक्षिके, संगीत, समुपदेशन, सकारात्मक राहण्याचे उपाय अशी माहिती अपलोड करता येईल. यातून त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखले जाईल. क्वारंटाईन ही त्याला शिक्षा वाटणार नाही.’’
कसे आहे डिझाइन?
क्वारंटाईनचे ठिकाण, एकूण प्रक्रिया आणि कालावधी सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने ईशान केसकर, शुभम गांधी, नीरज जावळे, टेजल श्रोत्रिया, भैरुमल सुतार यांनी हे डिझाईन तयार केले आहे. कोव्हीड ड्युटीवर असलेले वैद्यकीय कर्मचारी, आपापल्या गावी परतणारे मजूर आणि विद्यार्थी, अतिसंक्रमित क्षेत्रातील नागरिक या सर्वांनाच या सुविधांचा उपयोग होऊ शकतो, अशा पद्धतीने ही संकल्पना मांडली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोणत्या सुविधा असाव्यात, करमणुकीची काय साधने असावीत, स्वच्छता कशी राखली जावी, अशा सर्व बाबी सोप्या चित्रांमधून वर्णन करण्यात आल्या आहेत. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्याची तयारीही दाखवली आहे.