CoronaVirus News: ...मग संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा?; राजू शेट्टींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 06:53 PM2020-07-13T18:53:35+5:302020-07-13T18:54:19+5:30

धारावीतील कोरोना नियंत्रणात श्रेय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना सवाल

CoronaVirus raju shetty questions bjp and rss over their claim about corona control in dharavi | CoronaVirus News: ...मग संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा?; राजू शेट्टींचा थेट सवाल

CoronaVirus News: ...मग संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा?; राजू शेट्टींचा थेट सवाल

Next

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादावरून संघर्ष सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. संघानं धारावी कोरोनामुक्त केली, असा दावा केला जात असेल, तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा झाला?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. 

'धारावीत ज्यावेळी कोरोना संसर्गाचं प्रमाण अतिशय जास्त होतं, माणसं मरत होती, त्यावेळी संघाचे स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशी एकही बातमी पाहण्यात आली नाही. पण धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली, असे कौतुकोद्गार जागतिक आरोग्य संघटनेनं काढताच अनेकजण श्रेय घेण्यासाठी पुढे आले,' असं शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांनी नागपूरमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून संघाला लक्ष्य केलं. 'माझ्या मनात एक शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही. कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इंचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे. अनेक शहरात आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी तिथे जावं. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याचं काम करावं. महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल,” असा टोला शेट्टी यांनी लगावला.

धारावीतील कोरोना नियंत्रणाबद्दल काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
'ज्या गोष्टी कौतुकास्पद आहेत, त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण धारावीनं कोरोनावर मात केली आहे. पण यांचं श्रेय सरकारचं नसून, जीव धोक्यात स्क्रिनिंग करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला,' असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
 

Web Title: CoronaVirus raju shetty questions bjp and rss over their claim about corona control in dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.