CoronaVirus : दिलासादायक! राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले, २३६१ कोरोनाग्रस्तांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 08:27 PM2020-06-01T20:27:43+5:302020-06-01T20:27:54+5:30
CoronaVirus :राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ७०,०१३वर पोहोचली आहे.
मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून, राज्य सरकारही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात लॉकडाऊन असला तरी अनेक नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाताना सरकारनंही काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात आज ७७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आज २३६१ कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. राज्यात ७६ कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झालेला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ७०,०१३वर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मेमध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलिंग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर ३१ मार्च अखेर राज्यात ३०२ रुग्ण होते त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात १० हजार ४९८ रुग्ण होते. त्यातील १७७३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १६. ८८ टक्के होते.
३१ मे अखेर राज्यात ६७ हजार ६५५ रुग्णांपैकी २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढत ४३.३५ टक्के एवढा झाला आहे. राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजना, लागू केलेले लॉकडाऊन, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे त्यासोबतच केंद्र शासनाने सुधारीत डिस्चार्ज पॉलिसी जाहिर केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी ८००० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदविला गेला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमत्र्यांनी सांगितले.