Coronavirus : राज्यात निर्बंध तूर्त कायम राहणार; व्यापारी वर्गात निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 05:51 IST2021-07-15T05:47:39+5:302021-07-15T05:51:56+5:30
Coronavirus Restrictions in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; व्यापारी वर्गात मोठी निराशा

Coronavirus : राज्यात निर्बंध तूर्त कायम राहणार; व्यापारी वर्गात निराशा
कोरोना रुग्णवाढीचा वेग देशाच्या तुलनेत कमी असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका पाहता निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नाही. दुकाने, रेस्टॉरंटंची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शाळा सुरू होण्यासाठीचा प्रोटोकॉल तयार नसल्याने त्या लगेच सुरू होतील अशी शक्यता नाही. मात्र १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले. आठ दिवसांत डॉक्टरांच्या ८९९ जागा भरण्यात आल्या. पुढच्या काही दिवसांत १ हजार डॉक्टर भरले जातील. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्यावा अशी कुठलीही चर्चा बैठकीत झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्याची दररोज लसीकरण करण्याची क्षमता १० ते १५ लाख इतकी आहे. मात्र सध्या पाच दिवसांत ६ ते ७ लाख लसीच राज्याला मिळत आहेत. ऑगस्टपर्यंत राज्याला ४ कोटींपर्यंत लसीचे डोस उपलब्ध होणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून २५ टक्के लस घेता येऊ शकते. तो वाटा आपल्या राज्याला कसा जास्तीत जास्त मिळेल हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री लवकर याबाबत निर्णय घेतील, अशी मला अशा असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.
९३ टक्के रुग्ण १० जिल्ह्यांत
मागील एक महिना ७ ते ८ हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढत आहेत. राज्यातील ९३ टक्के रुग्ण १० जिल्ह्यांत आहेत. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये केवळ ८ टक्के रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, नगर, रायगड येथील रुग्णसंख्या वाढत असून, नियमांची काटेकोट अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
...अन्यथा टोकाची भूमिका घेऊ, व्यापाऱ्यांचा इशारा
शासन व प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडूनही सरकारने निर्णय न घेणे व्यापार्यांवर अन्याय आहे. व्यापार्यांच्या पदरी निराशा आली असून व्यापार्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन विस्फोट होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिला. तिसरी लाट येईल म्हणून व्यापार किती काळ बंद ठेवणार? आता आणखी वाट बघणे शक्य नाही. ताबडतोब परवानगी द्या, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.