CoronaVirus देशाच्या ४० टक्के भागात फैलाव; तरीही लॉकडाउन मागे घेण्यासाठी राज्यांचा दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:41 AM2020-04-06T06:41:11+5:302020-04-06T06:41:37+5:30
केंद्र चिंतेत; तीन दिवसांत देशाच्या ४० टक्के भागात कोरोनाचा फैलाव
नवी दिल्ली : लॉकडाऊन १५ एप्रिलनंतर मागे घेण्याची मागणी राज्यांमागून राज्ये करत असले तरी केंद्र सरकार चिंतेत असून निर्बंध शिथील करण्याबाबत कमालीची काळजी घेत आहे. देशात ७१२ जिल्ह्यांपैकी कोविड-१९ चे जिल्हे २११ वरून २७४ झाले ते फक्त तीन दिवसांत. हा फैलाव देशात ४० टक्के भागात झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिवांच्या उच्चाधिकार समितीला लॉकडाऊनबाबत काय कृती करणार याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. ११ एप्रिल रोजी या समितीची बैठक आहे. सरकारने अँटीबॉडी टेस्टस निवडलेल्या ४० हॉटस्पॉटसमध्ये बुधवारपासून घेण्यास परवानगी दिली आहे. यावरून लॉकडाऊन मागे घ्यावा की ठराविक ठिकाणेच निवडावी हे सरकार ठरवेल.
आरोग्य मंत्रालयाने २८ दिवसांसाठी हे हॉटस्पॉटस पूर्ण बंद करण्याची व मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी टेस्टस करण्याची सूचना केली आहे. पंतप्रधान मंत्रीगटाशी बुधवारी, आठ एप्रिल रोजी संसदीय पक्षांच्या नेत्यांशी तर मुख्यमंत्र्यांशी नऊ एप्रिलला व इतर सबंधितांशी रविवारी बैठका घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींची नेत्यांशी चर्चा
देशातील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील वेगवेगळ््या राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि प्रतिभा पाटील व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा यांच्याशीही बोलले.
शाळा, कॉलेज उघडण्याचा
निर्णय १४ एप्रिलनंतरच
कोरोनामुळे बंद केलेली देशभरातील शाळा-कॉलेजे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलला संपल्यावर परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेऊनच केला जाऊ शकेल, असे केंद्रीय मानवसंधान विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्ह्टले आहे.
ते म्हणाले की, सरकारच्या दृष्टीने विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा ही सर्वोच्च बाबआहे. १४ एप्रिलनंतरही शाळा-कॉलेजे बंद ठेवावी लागली तरी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.