CoronaVirus: वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट होणार?; अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:56 PM2020-04-10T12:56:41+5:302020-04-10T14:12:14+5:30
coronavirus शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं अजित पवारांना पत्र; वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्याची मागणी
मुंबई: कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अर्थमंत्री अजित पवारांना पत्रदेखील लिहिलं आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांचा पगार दुप्पट करण्यात यावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. याशिवाय पोलिसांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्याचा आग्रहदेखील त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. देशातले २० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण राज्यात आहेत. वैद्यकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी वेतन दुप्पट करण्यात यावं, अशी मागणी ठाण्यातल्या ओवळा-माजिवाड्याचे आमदार आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्री अजित पवारांकडे केली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विमा देण्याची मागणीदेखील सरनाईक यांनी केली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडू शकतो. हा भार कमी करण्यासाठी आमदारांच्या वेतनात कपात करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. सर्व आमदारांचा पगार ३० टक्के करण्याचा निर्णय याआधीच राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्यासाठी आणि पोलिसांना ५० लाखांचा विमा देण्यासाठी आमदारांच्या पगारात ५० टक्क्यांची कपात करण्यात यावी, असं सरनाईक यांनी अजित पवार यांना सुचवलं आहे.
हरयाणा सरकारनं कालच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू, मेदांता मेडीसिटीचे संचालक डॉ. नरेश त्रेहन, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेससोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्यात आल्याची माहिती दिली.