Coronavirus : शहरांमधील शाळा, कॉलेज, मॉल्स, कोचिंग क्लास ३१ मार्चपर्यंत बंद, प्रतिबंधासाठी कडक उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 06:24 AM2020-03-15T06:24:23+5:302020-03-15T06:24:52+5:30
जेथे गर्दी जमा होते असे कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्यभर बंदी घालण्यात आली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या मोठ्या शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा व तरणतलावही महिनाअखेरपर्यंत बंद करण्यात आले आहेत.
मुंबई : कोरोना साथीची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील आकडा शनिवारी सर्वाधिक होऊन ३१ पर्यंत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रतिबंधक उपायही अधिक कडक केले. त्यानुसार राज्यातील शहरांमधील शाळा, कोचिंग क्लासेस, अंगणवाड्या व महाविद्यालये येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याखेरीज जेथे गर्दी जमा होते असे कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्यभर बंदी घालण्यात आली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या मोठ्या शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा व तरणतलावही महिनाअखेरपर्यंत बंद करण्यात आले आहेत. याचप्रमाणे उच्च न्यायालयानेही त्यांचे मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठांचे न्यायालयीन सुनावणीचे काम फक्त तातडीच्या प्रकरणांपुरते मर्यादित ठेवण्याचे जाहीर केले आहे. या साथीवर यशस्वीपणे मात करण्यासाठी पुढील दोन आठवडे महत्त्वाचे असल्याने सर्वांनी या उपाययोजनांना उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केले. हे उपाय फक्त शहरी भागांना लागू असून ग्रामीण भागांत ही बंधने असणार नाहीत. सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी सन १८९७च्या साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कसोशीने सुरू केली
आहे.
मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाइकांना ४ लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले आहे. ही रक्कम स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंडातून (एसडीआरएफ) त्यांना दिली जाणार आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ८३ वर पोहोचली आहे. दिल्ली व कर्नाटकात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
बंदीची नेमकी व्याप्ती किती?
राज्यात २७ महानगरपालिका,
२४१ नगरपालिका आणि १२६ नगरपंचायती,
५४ विद्यापीठे व ४३१४ महाविद्यालये आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी व खासगी शाळा वगळता अन्य क्षेत्रातील म्हणजे जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाºया, पण या क्षेत्रात नसणाºया शाळा चालू राहणार आहेत.
सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी ज्या महाविद्यालये-शाळांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांनी त्या पूर्ण करून घ्याव्यात. मात्र, ज्यांच्या परीक्षा अद्याप सुरू झाल्या नाहीत, त्यांनी त्या १ एप्रिलनंतरच त्या घ्याव्यात. दहावी-बारावीच्या पेपर तपासणीचे काम शिक्षकांकडून सुरू राहणार आहे. अन्य शिक्षकांनाही शाळेत यावे लागेल.
-राजेंद्र पवार, उपसचिव, शालेय शिक्षण विभाग
कोरोना संशयिताचा बुलडाण्यात मृत्यू
बुलडाणा : कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो नुकताच हज यात्रा करून सौदी अरेबियातून बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात परतला होता. मृत ७१ वर्षीय रुग्ण गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यास मधुमेह, हृदयरोग व श्वसनाचा आजार होता.
परदेशातून आल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास वाढल्याने कोरोना संशयित रुग्ण म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये दुपारीच तपासणीसाठी पाठविले होते. अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशाने झाला हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित म्हणाले. मृत व्यक्तीचे शवविच्छेदन कोरोनाशी संबंधित सेफ्टी किट वापरूनच केले जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांचेही होम क्वांरंटीन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, वाशी कामोठेत चार नवे रूग्ण
मुंबई : मुंबई महानगर परिसरातीन कोरोना संशयित रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. शनिवारी ४ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबई १, ठाणे १, वाशी १, कामोठे १ येथील रुग्णांचा समावेश आहे. या चारपैकी तिघांना प्रवासाचा इतिहास आहे. हिंदुजा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या आठ अतिजोखमीच्या रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा कस्तुरबा रुग्णालय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात नऊ रुग्ण दाखल असून, त्यात पाच मुंबईचे व चार मुंबई महानगर परिसरातील रुग्ण आहेत.