Coronavirus: अतितातडीच्या नसणाऱ्या सेवा काही दिवस बंद कराव्या: पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:06 AM2020-03-12T10:06:24+5:302020-03-12T10:14:05+5:30
काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.
मुंबई : राज्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले ११ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८ रुग्ण हे पुण्यातील , दोन मुंबईतील आणि आता नागपूरातील एक आहे. राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नजर ठेवून आहे. तसेच अनेक यात्रा आणि गर्दीचे कार्यक्रम रद्द केली जात आहे. तर अतितातडीच्या नसणाऱ्या सेवा काही दिवस बंद कराव्यात अशी मागणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली आहे.
कोरोना व्हायरसचा महराष्ट्रात शिरकाव झाल्याने सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच आढळून आलेल्या रुग्णांपैकी कुठल्याही रुग्णाची प्रकृती ही गंभीर नाही. काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.
तर यावरूनच पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे की, कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी होणार असून शनिवारी अधिवेशनाचा समारोप होणार असल्याचे समजते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता शाळा, महाविद्यालय आणि अतितातडीच्या नसणाऱ्या सेवा काही दिवस बंद करण्यात याव्या, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी होणार, शनिवारी अधिवेशनाचा समारोप होणार असे समजते तसेच शाळा, महाविद्यालयात आणि अतितातडीच्या नसणाऱ्या सेवाही ही काही दिवस बंद कराव्या ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2020
पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण 11 व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.