Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:40 AM2021-05-28T10:40:40+5:302021-05-28T10:41:58+5:30

Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.

Coronavirus: In the second wave, the death toll in tribal-dominated, backward districts quadrupled | Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

Next

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.
२०२० च्या नऊ महिन्यांच्या तुलनेत कोरोनाने २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांतच कितीतरी अधिक बळी घेतले आहेत.

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत बाधितांची संख्या ९०२० होती आणि १०२ मृत्यू झाले होते व मृत्युदर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत १९,९६९ रुग्ण  निघाले आणि ६०२ मृत्युंसह मृत्युदर ३.०१ वर पोहोचला. गोंदिया आणि चंद्रपूर या इतर दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांतही मृत्युदर वाढला असून अमरावती जिल्ह्यात मृत्यू दुपटीहून अधिक वाढले तरी बाधितांची संख्या अधिक असल्याने दर मात्र कमी दिसतो.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पहिल्या लाटेत ८७०३ रुग्ण होते. त्यापैकी २९५ जणांचा मृत्यू झाला व मृत्युदर २.२४ टक्के होता, तर दुसऱ्या लाटेत २८५८० रुग्ण असून मृत्यू ६१० झाले व मृत्युदर २.१३ टक्के आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाब‌ळी दुपटीहून अधिक वाढले आणि मृत्यूदरही जवळपास पहिल्या लाटेइतकाच आहे. आश्चर्य म्हणजे, मुंबईच्या पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात मात्र, दुसऱ्या लाटेत मृत्यू आणि मृत्यूदर दोन्ही कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. 

का वाढले मृत्यू?
दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त. होम आयसोलेशनमधील रुग्णांची प्रकृती बिघडून ते अत्यवस्थ झाले.
पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदी केली होती. दुसऱ्या लाटेत ती परिस्थिती दिसली नाही.
ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा याबाबतच्या बातम्यांमुळे दहशत पसरली. त्या निगेटिव्ह भावनेने अनेकांना मृत्युने गाठले.
लोक अंगावर दुखणे काढत होते. चाचणी उशिरा केल्याने उपचाराला खूप कमी वेळ मिळायचा. 

दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भाव वेगाने झाला. गंभीर रुग्ण वाढले. लक्षणे जाणवल्यानंतरही अनेकजण तपासणीला टाळाटाळ करतात. उशिराने रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले.
    -डॉ. विपीन ईटणकर, 
    जिल्हाधिकारी, नांदेड. 

गैरसमजामुळे ग्रामीण भागातील लोक कोरोना टेस्ट करण्यासाठीही पुढे येत नव्हते. ग्रामीण भागासह जिल्हा मुख्यालयात सुसज्ज आरोग्य व्यवस्था असताना लोक रुग्णालयात भरती होण्यासाठी घाबरत होते. अनेक जण शेवटच्या क्षणी रुग्णालयात आल्याने ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाही.
    - दीपक सिंगला, 
    जिल्हाधिकारी, गडचिरोली

मराठवाडा : हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३५१६ रुग्ण आढळले आणि ५३ मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत १२०४३ रुग्ण सापडले आणि २९७ बळी गेले. पहिल्या लाटेत १.५० टक्के असलेला मृत्यूदर दुसऱ्या लाटेत एकदम २.४६ टक्क्यांवर गेला. परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत कोरोनाबळी दुपटीहून अधिक वाढले, मात्र बाधितांची संख्या अधिक असल्याने दर घसरलेला दिसतो.
 

Read in English

Web Title: Coronavirus: In the second wave, the death toll in tribal-dominated, backward districts quadrupled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.