Coronavirus शेअर कॅबमुळे संसर्ग वाढण्याचे प्रकार; Uber ने सेवा बंद केली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 01:50 PM2020-03-23T13:50:38+5:302020-03-23T13:52:21+5:30
महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी शेअर टॅक्सीतून झालेल्या संक्रमणामुळे गेला होता.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील पहिला बळी शेअर कॅबद्वारे संक्रमण झाल्याने गेला होता. दुबईहून आलेल्या पुण्यातील कुटुंबाला मुंबई विमानतळावरून पुण्याला एका टॅक्सीने सोडले होते. यामुळे तीच टॅक्सी बुक करणाऱ्या वृद्धाला संक्रमण झाले होते. त्यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी शेअर टॅक्सीतून झालेल्या संक्रमणामुळे गेला होता.
यामुळे ओला, उबरमधून प्रवास करणे धोक्याचे बनले होते. कारण या कंपन्यांद्वारे प्रवासी कॅब बूक करत होते. तसेच स्थानिक प्रवासीही या दोन्ही सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने कोरोना व्हायरस परण्याचा धोका होता यामुळे कंपन्यांनी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत आणि शेअर कॅब सेवा बंद केली होती. यामुळे एकट्याला किंवा कुटुंबाला हवी असल्यासच कॅब बुक करता येत होती. मात्र, आज अखेर उबरने सेवाच बंद केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे दिल्ली, मुंबईसह देशातील विविध शहरांमधील वाहतूक ठप्प झाली आहे. जगभरातील कंपन्यांना त्यांच्या सेवा बंद कराव्या लागत आहेत. उबरनेही टॅक्सी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या सेवेवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांवर परिणाम होणार आहे. कंपनीने इमेल आणि मॅसेजद्वारे ग्राहकांना सूचना केली आहे. यामध्ये कंपनीने असे म्हटले आहे की, सरकारच्या आदेशांनुसार आम्ही तुमच्या शहरातील उबरची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करत आहोत. याचा अर्थ पुढील सूचनेपर्यंत उबरची सेवा बंद असणार आहे.
याआधी या कंपन्यांनी त्यांच्या सेवेतील कॅब एक भाडे सोडून झाल्यावर सॅनिटाईज करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. कंपनीने कधीपर्यंत सेवा खंडीत करण्यात येत असल्याचे म्हटलेले नाही.