coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:58 AM2020-03-29T11:58:10+5:302020-03-29T11:59:21+5:30

राज्यात आता शहरांसोबतच तालुकास्तरावरसुद्धा मिळणार  रोज १ लाख शिवभोजन थाळी

coronavirus: Shiv Bhojan will be available for only Rs 5 | coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन

coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन

Next

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे.या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा  सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी,असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात क्षेत्रात तातडीने शिवभोजन केंद्र सुरू होण्यासाठी नव्याने शिव भोजनालय सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहे.त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

    शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे,जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे,भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याने राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व मजूर वर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.


जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४x७  मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे,बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे  मा.मंत्री कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मा.मंत्री महोदय यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मा.मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे.
श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-९८७०३३६५६०
श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी-९७६६१५८१११
श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-७५८८०५२००३
श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-७८७५२८०९६५

Web Title: coronavirus: Shiv Bhojan will be available for only Rs 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.